मंत्री खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यातील चोरी प्रकरणाचा उलगडा; तीन आरोपी अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

मंत्री खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यातील चोरी प्रकरणाचा उलगडा; तीन आरोपी अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव प्रतिनिधी शिवराम नगर येथील माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा रामानंद नगर पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात तिघा आरोपींना अटक करून तब्बल ६ लाख २१ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत मुक्ताई बंगला बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चेतन सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यात वापरलेली सुजुकी बर्गमन दुचाकी (MH-19-ER-5539) पोलिसांच्या हाती लागली. वाहनाच्या मालकाची चौकशी केली असता, चोरी आपल्या नातेवाईकांनी केल्याचे त्याने कबूल केले.

यानंतर पोलिसांनी जियाउद्दीन हुस्नोददीन शेख (३९, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला अटक केली. त्याच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी उल्हासनगर येथे धाड टाकून चिराग इकबाल सैय्यद (२२, रा. उल्हासनगर) व कैलास हिराचंद खंडेलवार (४८, रा. कल्याण) या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ६ लाख २१ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या मुद्देमालात ३१.९७० ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, लगड, चैन, अंगठ्या, कानातील रिंग तसेच २१७ ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्तीचा समावेश आहे. मात्र, या प्रकरणातील तीन मुख्य आरोपी — मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी व ‘बाबा’ (पूर्ण नाव अज्ञात) — हे उल्हासनगर-मुंबई परिसरातील असून, ते अद्याप फरार आहेत. या तिघांवर मुंबई व गुजरात राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत २० हून अधिक घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे.

या कारवाईत रामानंद नगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समन्वयाने कार्य करत उल्लेखनीय यश मिळवले. तपासात पोलीस नाईक हेमंत कळसकर व पोलीस कर्मचारी गोविंदा पाटील यांनी मोलाचे योगदान दिले, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन रणेशवरे, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत, विनोद सुर्यवंशी, तसेच गुन्हे शाखेचे शरद बागल, अक्रम शेख आणि प्रितम पाटील आदी अधिकारी सहभागी होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणेशवरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.