व्याजाच्या पैशांवरून रिक्षाचालकाला मारहाण; फायटरने केले गंभीर जखमी, चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : व्याजाने घेतलेल्या रकमेच्या वादातून शहरातील मास्टर कॉलनीत राहणाऱ्या एका रिक्षा चालकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी जोशी पेठ भागात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेख शकील शेख गुलाब (वय ४३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोलू शिंपी, सागर सोनवणे, नितीन बोरसे आणि मयूर (पूर्ण नाव अज्ञात) या चौघांनी १ लाख ७५ हजार रुपयांच्या व्याजाच्या पैशांची मागणी करत त्यांना अडवले.
जोशी पेठेतील लाकडाच्या वखारीजवळ ही घटना घडली. पैसे परत दिल्याचे सांगून थोडे थोडे देण्याची तयारी शेख शकील यांनी दर्शवताच आरोपी संतापले आणि त्यांनी शेख शकील यांना मारहाण केली. यावेळी मयूर नावाच्या इसमाने हातातील फायटरने शेख शकील यांच्या चेहऱ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी शेख शकील यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तपास सफौ परिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

