जळगावात एकाच रात्रीत दोन घरफोड्या ; २५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास!
जळगाव: शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत दोन घरे फोडली. एका घरातून २५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले, तर दुसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गिरणा पंपिंग रोडवरील राम नगर भागात राहणारे ऋषीकेश येवले (वय २६) हे टाटा कॅपिटल कंपनीत नोकरीला आहेत. दि. १५ मार्च रोजी त्यांची पुण्यात राहणारी बहीण घरी आल्याने ते कुटुंबासह भडगाव येथे मामाला भेटण्यासाठी गेले होते. मात्र, दि. १७ मार्च रोजी सकाळी घरी परतल्यावर त्यांना धक्काच बसला!
मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते, तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटे उघडून तपासल्यावर १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि देवघरातील दोन सोन्याच्या अंगठ्या (५ ग्रॅम) असा एकूण २५ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.
दुसऱ्या घरातही चोरीचा प्रयत्न, मात्र हाती लागले शून्य!
याच भागात राहणारे संजय चौधरी यांचे घर देखील चोरट्यांनी फोडले, मात्र तेथे काहीही हाती न लागल्याने रिकाम्या हाती परतावे लागले. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेजचा आधार
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
नागरिकांत भीती, गस्त वाढवण्याची मागणी
या चोरीच्या घटनांमुळे राम नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे.