रुग्णवाहिका चालकांची समस्या गंभीर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जळगाव ;- जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांच्या वेतनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासन एकमेकांवर खापर फोडण्यात मग्न झालेले आहे. जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक अडचणीत असतांना देखील एकाही लोकप्रतिनिधीने यावर आवाज उठविला नाही. रुग्णांचा जीव वाचविण्यात रुग्णवाहिका चालकाचा देखील मोठा वाटा असतो. वेळेवर रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहचविणारे चालकच अडचणीत सापडले असून त्यांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधींना मात्र वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या मुंबर्इत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आमदारांकडून लक्षवेधी मांडण्यात येत आहेत मात्र जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकेवरील चालकांबद्दल एकाही आमदाराने प्रश्न उपस्थित न केल्याने चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासूनचे रुग्णवाहिका चालकांचे वेतन थकले असून प्रशासनाकडून चालढकलीचे धोरण स्विकारले जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शनाच्या नावाखाली आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार केला असून त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्टता नसल्याचे सांगून अधिकारी यातून नामनिराळे होण्याच्या तयारीत आहेत.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; चालकांमध्ये नाराजी
जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असून तो सुटण्या ऐवजी अधिक पेचातच पडत आहेत. मध्यंतरी चालकांनी पालकमंत्री व काही आमदारांच्या भेटी घेवून त्यांना समस्या सोडविण्याची विनंती केली मात्र या प्रश्नी एकाही आमदाराने आवाज उठविला नसल्याने चालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.