जळगाव रेल्वे स्थानकावर दुर्दैवी घटना – चालत्या रेल्वेत चढताना तोल जाऊन तरुणाचा मृत्यू
जळगाव: रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेत चढताना तोल गेल्याने एका ३९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, १० मार्च रोजी रात्री ९ वाजता घडली. हा अपघात कामायनी एक्सप्रेसमध्ये चढत असताना घडला.

अनिल जाधव हे रावेर शहरात पत्नी आणि मुलासह वास्तव्यास होते आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते पत्नी आणि मुलासह जळगाव येथील सासरवाडीला आले होते. वाढदिवसानंतर सोमवारी रात्री ते रावेरला परतण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचले.
रात्री ९ वाजता कामायनी एक्सप्रेस रेल्वे स्थानकात आली. अनिल जाधव हे गाडीत चढत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट रेल्वेखाली पडले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. मंगळवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.


