देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले !
यु. व्ही. राव यांचे प्रतिपादन : अनुभूती स्कूमध्ये विज्ञान प्रदर्शन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे. विज्ञान हे निसर्गाची देणगी तर तंत्रज्ञान मनुष्यनिर्मित आहे. संशोधनातून शास्त्र तर आविष्कारांतून टेक्नॉलॉजीचे महत्त्व समजण्यासाठी ‘विज्ञानानुभूती विज्ञान प्रदर्शन’ मोलाचे ठरते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधून मनुष्य जीवनात शाश्वता कशी आणता येईल, याबाबत विचार केला पाहिजे; असे मनोगत यु. व्ही. राव यांनी व्यक्त केले.
अनुभूती रेसिडेंशीयल स्कूलमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, डॉ. भावना जैन व्यासपीठावर होते. स्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता.
मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शाश्वता यासह पाणी, विज, शेती अशा विविध विषयांना धरून वेगवेगळे असे 50 च्यावर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: साकारून सादर केले आहे. त्यात न्युटनचा साधा नियम यापासून तर रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रोमॅकनिकल अशा विषयांच्या प्रोजेक्टस्ची मांडणी विद्यार्थ्यांनी केली. जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांनी प्रत्येक प्रोजेक्टला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आलेला प्रयोग समजावून घेतला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अन्मय जैन याने केले.
अनेक शाळांचा सहभाग
शहरातील रुस्तुमजी इंटरनॅशनल स्कूल, भगिरथ हायस्कूल, सेंट टेरेसा स्कूल, आयडीएल इंग्लिश मिडीयम स्कूल, वर्ल्ड स्कूल भुसावळच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी हजेरी लावली. संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांनी अनुभूती सायन्स व टेक्नॉलॉजी मिट व अनुभूती सायन्स क्विज स्पर्धेतसुद्धा सहभाग नोंदविला.