जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पतंग उडवताना अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडतात. अशीच एक दुर्देवी घटना घडलीय. सुट्टी असल्याने मित्रांसोबत पतंग उडवण्याचा आनंद महागात पडला. विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी गेला असता विजेचा जोरदार झटका बसल्याने १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली आहे. लोकेश सोपान पाटील (वय १५, बोरखेडा, ता. धरणगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश हा आई, वडील, लहान भाऊ, काका, काकू यांच्यासह पाळधी येथे वास्तव्यास होता. पाळधी येथे लोकेशचे वडील सोपान पाटील हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. यामुळे घरची परिस्थिती हलाखीची होती. दरम्यान २५ जानेवारीला संध्याकाळी लोकेश हा त्याच्या मित्रांसह पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना लोकेशचा पतंग विद्युत तारांमध्ये अडकला.
हा पतंग काढण्यासाठी लोकेश हा जवळच राहत असलेल्या त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर गेला. विद्युत तारांमध्ये अडकलेली पतंग खेचताना त्याला विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून त्याच्यासोबत खेळत असलेले त्याचे मित्र घाबरून पळाले. घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले.
दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले. या घटनेची नोंद पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. यावेळी कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.