जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातून एक दुर्देवी घटना समोर आलीय. शहरातील रायसोनी नगर येथील एका अपार्टमेंटच्या बांधकामावरून पाचव्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
ज्ञानेश्वर श्रावण राठोड (वय २८, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुण मजुराचे नाव आहे. तो आई, वडील, पत्नी, मुलांसह राहत होता. बांधकामांवर मजूर म्हणून काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान सोमवारी दि. २७ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर हा इतर मजूर मित्रांसह रायसोनी नगरातील एका अपार्टमेंटच्या बांधकामावर कामाला गेला होता. तेथे पाचव्या मजल्यावर शिडीवरून चढून काम करीत होता. अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.
इतर मजुरांनी त्याला रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तत्काळ दाखल केले. तेथे तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, २२ दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस ५ जानेवारी रोजी मित्रांनी साजरा केला होता. या घटनेमुळे कुसुंबा गावात शोककळा आहे. घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.