लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले. एकनाथ शिंदेंच्या रुसवे फुगल्यानंतर अकरा दिवसांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचे सोबत दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही शपथविधी झाला. मुंबईच्या आझाद मैदानावर दिमाखदार सोहळ्यात हा महाशपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री हे उपस्थित होते. त्याचबरोबर सिने सृष्टीतील अनेक सेलिब्रिटी तसेच इतर क्षेत्रातील सेलिब्रेटी अनेक उद्योगपतींसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ४० हजार लोक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे अजित पवार यांना शपथ देण्यात आली. आजच्या सोहळ्यात एकाही मंत्र्याला शपथ देण्यात आली नसल्याने आता मंत्री कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर मागील तिन्ही मंत्र्यांचाच समावेश राहिला की नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल हेही बघावे लागणार आहे.
नवीन चेहऱ्यांमध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आमदार संजय सावकारे यांना मंत्रिपद मिळावे असा दावा केला जातोय, त्याचबरोबर आमदारकीची हॅट्रिक करणारे जळगाव शहर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजूमामा भोळे हे सुद्धा मंत्रीपद मिळण्याच्या शर्यतीमध्ये आहेत. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आलेले शिंदे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजीकचे आमदार म्हणून मंत्रीपद मिळण्यासाठी त्यांची लॉबिंग सुरू आहे. तर दुसरीकडे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आमदार मंगेश चव्हाण हे तरुण तडफदार आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत नजीकचे म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कारकीर्दीत चाळीसगाव तालुक्याचा चेहरा मोहरा त्यांनी बदलवून टाकलाय. शिवाय जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे ते चेअरमन आहेत. तरुण, तडफदार आमदार म्हणून ते जरी दुसऱ्यांदा आमदार झाले असले तरी मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचेही मंगेश चव्हाण
विश्वासू सहकारी मानले जातात. महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहेत. भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे होय. महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष एकूण १३२ आमदार आहेत. त्यामुळे सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार २२ ते २३ मंत्री भाजपच्या वाटेला येतात, त्या पाठोपाळ दहा ते अकरा शिवसेना आणि सात ते आठ मंत्री राष्ट्रवादीला मिळतील. शिवसेना आणि राष्ट्रवादीतर्फे ज्यांची नावे मंत्रीपदासाठी सुचविले जाईल त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होईल. भाजपच्या निर्णया मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील त्यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे असल्याने त्यांना मंत्रिमंडळाचे चांगले खाते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही; त्यामुळे जिल्ह्यातील नवीन चेहऱ्याला एका राज्यमंत्र्यांच्या रूपाने संधी मिळू शकते त्याच संजय सावकारे, राजूमामा भोळे अथवा मंगेश चव्हाण यापैकी कुणाची एकाची वर्णी लागू शकते, त्याचप्रमाणे शिवसेनेतर्फे निवडून आलेले आमदार किशोर पाटील यांची लॉटरी लागते की पुन्हा वरिष्ठ म्हणून गुलाबरावांनाच मंत्रिपद दिले जाते हे पाहावे लागणार आहे. कारण किशोर पाटील एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी जोरदार लॉबिन केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले मंत्री अनिल भाईदास पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार की नाही हे पाहावे लागणार आहे. एकंदरीत जुन्यांनाच मंत्रिपदे मिळतात की नवीन चेहऱ्यांना संधी मिळते हे बघावे लागणार आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा बोलून दाखवली होती बघू या काय होते ते ! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे अभिनंदन !!!