जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. सदरची धक्कादायक घटना जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात २५ नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील अश्विन दीपक चौरसिया (वय ३६) असे मयत तरुणाचे नाव आहे. अश्विन हा पत्नी, एक मुलगा व एक मुलगीसह राहत होता. दरम्यान सोमवारी रात्री नऊला अश्विन हा बळीराम पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या वडिलांच्या घरून डबा घेऊन गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटमध्ये असलेल्या घरी आला. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास अश्विनचा लहान भाऊ अक्षय याला अश्विनच्या शालकाच्या पत्नीने फोन करून अश्विनने दुसऱ्या माळ्यावरून उडी घेतल्याची माहिती दिली.
दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अश्विनला तपासून मृत घोषित केले होते. यावेळी कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.