अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर कार्यालयामार्फत अनुसुचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षांच्या पुर्व तयारीकरीता 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी  1 डिसेंबर ते 15 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. या प्रशिक्षणाकरिता प्रवेश मिळवण्याकरीता http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

 

प्रशिक्षणाकरिता प्रवेश मिळवण्याकरीता  उमेदवाराला काही अटींचे पालन करावे लागणार आहे. जसे की उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. (जातीचा दाखला आवश्यक), उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा शालांत परिक्षा (10 वी) उत्तीर्ण असावा, उमेदवार हा 18 वर्ष वय पुर्ण झालेला असावा.

या प्रशिक्षण कालावधीत  भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध शासकीय/निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थित प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर चार पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता मुलाखत होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी  शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी, पदवी (सर्व शैक्षणिक पात्रता) गुणपत्रिका, आधार कार्ड, बैंक पासबूक, दोन पासपोर्ट साईज फोटो, अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला या कागदपत्रांच्या मुळ व झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दुरध्वनी क्र. ०२५८४-२५१९०६ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर, जि. जळगाव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.