निवडणूक कालावधीत गोळीबाराच्या दुसऱ्या घटनेचा अन्वयार्थ..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत जळगाव जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कालावधीत अपक्ष उमेदवारावर गोळीबार झाल्याच्या दोन घटना घडल्या. दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅलीत त्यांच्या मोटारीवर तिघा अज्ञात इसमांनी गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या आणि ते तिघे फरार झाले. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाला नाही. नंतर त्या तिघा आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यानंतर सोमवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शेख अहमद गुलाम हुसेन यांच्या जळगाव शहरातील मेहरून येथील घरावर अज्ञातांनी तीन गोळ्यांच्या फैरी झाडल्या. यात घराच्या खिडकीची काच फुटून एक गोळी घरात गेली.

सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. पंधरा दिवसांच्या अंतराने जिल्ह्यात झालेल्या गोळीबाराच्या या घटनेने गुंडगिरी अथवा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. गोळीबाराच्या दोन्ही घटना अपक्ष उमेदवाराच्या संदर्भात झालेल्या असल्याचे दिसून येते. एक घटना दिवसाढवळ्या प्रचार रॅलीत झाली, तर मेहरून मधील गोळीबार पहाटेच्या अंधारात झालेला आहे. ज्याच्यावर गोळीबाराचा निशाणा आरोपींनी केला, ते दोघेही विधानसभा निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार आहेत. हे विशेष. त्यामुळे गोळीबाराच्या घटनेमुळे मतदारांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. तथापि निवडणूक कालावधीत गोळीबाराची घटना जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असून बोदवड मधील गोळीबाराच्या कारणाचा अद्याप पोलीस शोध घेत असताना त्या पाठोपाठ जळगाव मधील हा गोळीबार झाला. अज्ञात आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याशिवाय या गोळीबाराचे कारण काय? हे कळू शकणार नाही तथापि राजकारण हेच त्यामागचे कारण असेल असे वाटते परंतु आधी पोलिसांना आरोपींना ताब्यात घेणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक चर्चांना उधाण येईल. त्यातून तर्कवितर्क लढवायला सुरुवात होईल. परंतु विधानसभा मतदान निर्भय वातावरणात व्हायचे असेल, निर्भयपणे मतदारांनी घराबाहेर पडायचे असेल तर पोलीस प्रशासनाच्या वतीने मतदारांमधील भीतीचे वातावरण दूर करणे गरजेचे आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघातील गोळीबारातील आरोपी हे सराईत गुंड असल्याचे निशान्न झाले आहे. जळगाव मधील गोळीबारातील आरोपी कोण आहेत? हे पोलीस तपासून निष्पन्न होईल. परंतु अपक्ष उमेदवार हे एआयएमआयएम या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळाली नसल्याने ते पक्षाविरुद्ध बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवीत आहेत. त्यामुळे पक्षीय वादातून हा गोळीबार झाला असावा का? असा सर्वसामान्य प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यात तथ्यंश असल्याचेही दिसून येते. परंतु कायदा हातात घेऊन गोळीबार करणारा कोणीही असो, तो गुन्हेगारच होय. अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराच्या मागे कोणाकोणाचा हात आहे? याचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. अन्यथा कोणीही पुढाकार घेऊन गुन्हेगारांमार्फत आपले इस्पित साध्य करेल. जळगाव जिल्ह्यातील मेहरून परिसर शांत दिसत असला, तरी संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. बाजूला असलेल्या झोपडपट्टीत नेहमी गुन्हेगारी कृत्य घडत असते.

पोलिसांनी वेळीच ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांततेच्या मार्गाने निवडणूक प्रचार चालला असताना अशा प्रकारच्या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यातला गालबोट लागले. जिल्ह्याबाहेर महाराष्ट्रात एक वेगळा संदेश जातो. ‘जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार !’ असे माध्यमांमध्ये वृत्त झळकतात. जळगाव जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून अशा घटना पुसून काढण्यात पोलीसच चांगली कामगिरी करू शकतात. गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याचे काम पोलिसांनी तातडीने करावे. राजकीय वादातून झालेल्या या घटनेबाबत जनतेने गांभीर्याने न घेता निर्भयपणे मतदानाच्या हक्क बजावा, लोकशाहीत निवडणुकीच्या उत्साहात मतदानाचा टक्का कसा वाढेल, असा मतदारांनी निश्चय करावा. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वसामान्य मतदारांना प्रोत्साहित करण्याचे कार्य सुशिक्षित जनतेने केले पाहिजे. त्यासाठी मतदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी येथे बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदारांनी निर्भयपणे घराबाहेर पडून मतदानाचा पवित्र हक्क बजवावा हेच, या निमित्ताने मतदारांना नम्र आवाहन…!

Leave A Reply

Your email address will not be published.