जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा उद्या सोमवार दि. 18 रोजी थंडावणार आहेत. सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे हार्टबीट आता चांगलेच वाढले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले असून प्रमुख उमेदवारांच्या लढती सुद्धा रंगात आल्या आहेत. खुला प्रचार संपवण्यासाठी आता अवघा एकच दिवस उरला आहे. दि. 18 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्यानंतर छुपा प्रचाराला वेग येणार आहे.
राज्य विधानसभेच्या जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघासाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचाराची चांगलीच रणधुमाळी सुरू असून अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापविले आहे. उमेदवार तसेच त्यांच्या समर्थकांकडून चांगलाच जोर लावण्यात येत आहे.
प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, बैठकांचे सत्र मागील काही दिवसांपासून जोरात सुरू असून आता प्रचारात सर्व पक्षांनी जोर धरला आहे. प्रचारासाठी भोंगे, बॅनर्स, स्टिकर्स, स्क्रीन वॉलचा पुरेपूर वापर करण्यात आला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उमेदवारांच्या प्रचाराने जिल्ह्यातील अनेक भाग दुमदुमून गेले.
उद्या दि. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावणार असून त्यानंतर उमेदवारांचा छुपा प्रचार सुरू होत आहे. विशेष म्हणजे मतदानाआधी अनेक राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत एकूणच राजकीय परिस्थिती पाहता मिळत आहे. उमेदवारांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे राहणार आहेत.
आजपासून जिल्ह्यात ड्रायडे
विधानसभा निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने उद्या दि. 18 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून दि. 20 नोव्हेंबरपर्यंत, तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि. 23 नोव्हेंबर रोजीही ड्रायडे राहणार आहे. याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दिले आहेत.
मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच दि. 18 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजेपासून मतदानाच्या पूर्वीचा 19 आणि मतदानाचा दिवस 20 नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच मतमोजणीचा दिवशी दि. 23 नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद राहणार आहे.
जिल्हा होणार बॅनर, पोस्टरमुक्त
प्रचारादरम्यान शहरासह जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये चौका-चौकात, प्रमुख रस्ते तसेच इमारतींच्या दर्शनी भागावर उमेदवारांचे मोठे पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. उद्या दि. 18 नोव्हेंबर रोजी प्रचार तोफा थंडावल्यानंतर हे सर्व पोस्टर्स, बॅनर्स काढले जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शहर मोकळे श्वास घेवू शकेल. बॅनर, पोस्टरमुक्त जिल्ह्यासाठी आता आणखी काही तासांची प्रतिक्षा राहणार आहे.