जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांत पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, मुंबई चे अध्यक्ष ललित गांधी शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगांव दौऱ्यावर येत असून यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र चेंबरचे सदस्य, विविध उद्योजक, व्यापारी यांचा ‘अध्यक्षांशी संवाद’ आयोजित केला आहे.
या बैठकीत जळगांव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जिल्ह्यातील उद्योजक व व्यापारी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच सभासदातंर्गत व्यापार वृद्धीसाठी बिझनेस नेटवर्किंग बाबत मार्गदर्शन, जळगाव जिल्ह्यातील विविध उत्पादने व कृषी उत्पादनांना निर्यातीच्या संधी, निर्यातदारांना ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजन’ सेवेचा शुभारंभ, वीज दरवाढीला पर्याय म्हणून भांडवल गुंतवणूक न करता ‘रिन्यूऐबल एनर्जी’ उपलब्धतेसाठी महाराष्ट्र चेंबरचा विशेष उपक्रम, जीएसटी, फूड सेफ्टी ऍक्ट, बाजार समिती संबंधित अडचणींवर उपाययोजना यावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी मार्गदर्शन करणार आहेत.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्ह्यातील महाराष्ट्र चेंबरच्या सदस्यांसह उद्योजक व व्यापारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गव्हर्निंग कौन्सील मेंबर संगीता पाटील, दिलीप गांधी, नितीन इंगळे, महेंद्र रायसोनी, किरण बच्छाव, पुरुषोत्तम तावरी, संजय दादलिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.