जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
“परोपकारार्थमिदं शरीरम्” (भगवंताने आपलं शरीर हे परोपकारासाठी निर्मिले आहे) या उक्तीनुरुप ज्यांनी आध्यात्मिक तथा समाजसेवेचे अहर्निश अमूल्य योगदान समाजाला दिले. त्या श्री सत्य साईबाबांच्या कार्याने प्रेरित होऊन जळगांव मधील नामांकित वकील आनंद मुजुमदार, जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी बी. जी.नाईक, गिरीश पाटील, कोमलसिंग पाटील आणि मयूर चव्हाण यांच्या आर्थिक योगदानातून नशिराबाद जवळील “भागपुर” या छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे समाज सेवेच्या स्वरूपात मोफत वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी पठाण, शाळेचे मुख्याध्यापक विजय निकम, शिक्षक प्रकाश सोनवणे, अंगणवाडी सेविका अनिता यांचे अमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमास पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.