निधी फाऊंडेशन महिलांना करून देणार महत्त्वाची आठवण, पॉकेट कार्डचे अनावरण!

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरात मासिक पाळी विषयावर कार्यरत असलेल्या निधी फाऊंडेशनतर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घराबाहेर पडताना आपल्या सोबत महत्त्वाच्या वस्तूंसोबतच सॅनिटरी नॅपकीन देखील असावे असा संदेश देणारे पॉकेट कार्ड निधी फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. नुकतेच भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते पॉकेट कार्डचे अनावरण करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात मासिक पाळी आणि महिलांच्या विविध विषयावर निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून वैशाली विसपुते या कार्यरत आहेत. मासिक पाळी कापडमुक्त अभियान, गाव दत्तक उपक्रम, सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन असे विविध प्रकारचे उपक्रम आजवर वैशाली विसपुते यांनी राबविले आहेत. महिलांना बऱ्याचदा घराबाहेर पडताना मासिक पाळी आल्यास मोठी अडचण निर्माण होते. महिलांची कुचंबणा लक्षात घेता निधी फाउंडेशनतर्फे एक लहान जनजागृती माहिती पत्रक तयार केले आहे.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच जनजागृती माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. माहिती पत्रकाचे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी कौतुक करीत निधी फाऊंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माहिती पत्रकात महिलांनी घराबाहेर पडताना सोबत घ्यायच्या वस्तू, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, महिलांचे हक्क आणि अधिकार याची जाणीव करून देणारे संदेश देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील महिलांना या माहिती पत्रकाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती वैशाली विसपुते यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.