शिंदे भाजप गटाला महाविकास आघाडीचा धक्का

0

लोकशाही, संपादकीय लेख

 

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १२ पैकी ६ बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे भाजप गट विजयी झाला असला तरी इतर ६ पैकी ५ बाजार समितीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पाचोरा भडगाव बाजार समिती त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून, किशोर आप्पा पाटलांनी (Kishore Appa Patil) १८ पैकी सर्वाधिक ९ जागा जिंकल्या असल्या तरी सत्ता आप्पाचे कट्टर विरोधक असलेल्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे. पाचोरा भडगाव बाजार समिती सुरुवातीला मतमोजणीनुसार महाविकास आघाडीला ८ सेना भाजपला ८ आणि शिंदे गटाचे २ उमेदवार विजयी झाले होते. परंतु फेर मतमोजणी नंतर महाविकास आघाडीची एक जागा घटली त्यामुळे महाविकास सात शिवसेना-भाजप ९ आणि शिंदे गटाला २ अशा जागा मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी सभापती आमचाच होणार अशी प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटलांनी दिली. तरी एक उमेदवार फोडाफोडीचा घोडे बाजार होईल यात शंका नाही. त्यामुळे आमदार किशोर आप्पांना सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता राखण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिंदे भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक मोठा धक्का पारोळा बाजार समितीत आमदार चिमणराव पाटलांच्या (Chimanrao Patil) पराभवाने बसला. पारोळा बाजार समितीत एकूण १८ पैकी १७ जागा जिंकून चिमणराव पाटलांच्या पॅनलचा पूर्ण सफाया केला. पारोळा बाजार समितीवर असलेल्या आमदार चिमणराव पाटलांच्या वर्चस्वाला जणू सुरुंगच लागले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने चिमणराव पाटलांच्या हयातीत बाजार समिती खेचून आणली आहे. पारोळा बाजार समिती निवडणूक निकालने महाविकास आघाडीतील उमेदवार माजी मंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रंगीत तालमीत विजयाची बाजी मारली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटलांची धाकधूक वाढवली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे एक प्रमुख आमदार चिमणराव पाटील यांचा पराभव करत उद्धव ठाकरे गटाकडून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. चिमणराव पाटील यांचा पराभव पालकमंत्री गुलाबराव पाटलांसाठी (Gulabrao Patil) मोठा धक्का म्हणावा लागेल.

जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे भाजप गटातर्फे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांना टार्गेट करण्यात आले होते. एकनाथराव खडसेंना त्यांच्या बोदवड बाजार समिती मतदार संघातून त्यांच्या पॅनलचा पराभव करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नियोजन केले होते. त्यासाठी बोदवड बाजार समिती शिवसेना भाजप पॅनलचे नेतृत्व आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्याकडे सोपवून त्यांना दोन्ही मंत्र्यांकडून पूर्ण सहकार्य करण्यात आले होते. त्यामुळे बोदवड बाजार समिती निवडणुकी ही चूरशीची होईल असे वाटत होते. कारण बोदवड बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनल ऐवजी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल बनविण्यात आले होते. मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील काँग्रेसकडून सुद्धा एकनाथराव खडसेंच्या पॅनल मधून बाहेर पडले होते. गेली २५ वर्षे बोदवड बाजार समितीवर एकनाथराव खडसेंची सत्ता असल्याने यावेळी सत्ता पालट होईल असे वाटत असतानाच बोदवड बाजार समितीत १८ पैकी १७ जागा जिंकून एकनाथराव खडसेंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची बाजार समिती निवडणुक ही रंगीत तालीम समजली जाते असल्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना धडकी भरणे साहजिक आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.