जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील ग्राम गौलखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगत शौचालयाचे बांधकाम केल्याप्रकरणी लिखाण करून संबंधित बांधकाम पत्रकार सागर झनके यांनी थांबविले होते. सागर झनके हे सातत्याने समाजहिताचे लेखन करीत असतात. ह्या लिखाणाचा रोष म्हणून गावातीलच सरपंच पती देवचंद पवार आणि उपसरपंच जिजाबाई बहाळे यांचा मुलगा अमोल बहाळे यांनी दिनांक २०मार्च रोजी घरी येऊन सागर झनके यांना गलिच्छ शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पत्रकार झंनके यांच्या तक्रारीवरून दिनांक २९ मार्च रोजी जळगाव पोलीस स्टेशनला सरपंच पती देवचंद पवार आणि उपसरपंच यांचा मुलगाअमोल बहाळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. देवचे करीत आहेत.
सदर गट ग्रामपंचायतचे सरपंच पद आणि उपसरपंच पदी दोन्हीही महिलाच विराजमान आहेत. परंतु संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकाराचा इथे गळा घोटल्या जात असून सरपंच सीमा पवार यांचे पती देवचंद पवार आणि उपसरपंच यांचा मुलगा अमोल बहाळे हेच ग्रामपंचायतीचा कारभार बघत आहेत. सातत्याने ग्रामविकासाच्या कामात ह्या मंडळीचा खोळंबा असतो. गौलखेड हे गाव जिगाव क्षेत्र अंतर्गत येत असून शासकीय स्तरावर गाव नमुना रजिस्टरमध्ये पंचायत समिती प्रशासन व ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुद्धा यापूर्वी केलेला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा यापूर्वी काही संघटनांनी केली होती.
महिला अधिकारावर सातत्याने गदा आणणारे देवचंद पवार आणि अमोल बहाळे यांच्यावर सुद्धा पंचायत समिती प्रशासनाने कार्यवाही करावी आणि सरपंच आणि उपसरपंच यांचा मान त्यांना देऊन त्यांनाच गावचा कारभार करू द्यावा अशी मागणी सुद्धा पत्रकार संघटनेने केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका सरचिटणीस असलेले जेष्ठ पत्रकार सागर झनके हे एका वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी असून सातत्याने अन्यायाविरोधात लिखाण करीत असतात. सागर झनके यांनी दिलेल्या तक्रारीवर जळगाव (जामोद) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधितांना अटक करून त्यांचे वर कठोर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांनी सुद्धा केली आहे. पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी.