पोलीस आवारात झोंबाझोंबी करणाऱ्यांना पोलिसांचा चोप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात संशयितास प्रतिबंधात्मक कारवाई साठी आणले असता, प्राणघातक हल्ल्यातील संशयित ‘भाई’च्या काही साथीदारांनी यावेळेस पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयाच्या आवारात गर्दी करून झोंबाझोंबी केल्याचे पोलिस अधीक्षकांच्या नजरेस पडले. तत्काळ गाडी थांबवून स्वतः चौकशी करत या भामट्यांना दंडूक्याचा प्रसाद देत भाईगिरी उतरविली. त्यानंतर त्यांना कारवाईसाठी जिल्‍हापेठ पोलिसात रवाना केले.

संशयिताला रामानंदनगर पोलिसांनी गुन्हे शाखेत आणले असता. त्याच्या दहा ते पंधरा साथीदारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात गर्दी केली. सायंकाळी नेमके पोलिस अधीक्षक एम. राजकुमार शासकीय वाहनाने आयपी मेसकडे जात होते. त्यांना गोंधळ दिसला. तत्काळ त्यांनी वाहन थांबवून स्वतः चौकशी सुरू केली.

गर्दी करून गोंधळ घालणारे तरुण अट्टल गुन्हेगाराच्या समर्थनार्थ आल्याचे कळताच पोलिस अधीक्षकांनी स्वतःच हातात दांडा घेत त्या सर्वांना योग्य जागी यथेच्छ प्रसाद दिला. पोलिस अधीक्षक स्वतःच कारवाई करीत असताना, पाहून इतर अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. संशयितांना ताब्यात घेत वरिष्ठाच्या सुचनेनुसार संशयितांना जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात कारवाईसाठी रवाना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.