विक्रीतून व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी २०० विद्यार्थी उतरले रस्त्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा आत्मविश्वास प्रबळ होईल. “मंडी” या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, व्यवहाराची माहिती व सखोल व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी नक्कीच मिळेल. तसेच उत्पादनाची संपूर्ण माहिती विक्रेत्याला असायला हवी. अवगत भाषेवर प्रभूत्व महत्वाचे आहे. कोणतेही काम करीत असताना पारदर्शकता महत्वाची भूमिका पार पाडते याची जाणीव ठेवा. व्यवसाय करण्यासाठी पुस्तकीज्ञाना इतकाच अनुभव महत्वाचा असतो. आणि ते अनुभव रायसोनी मंडी सारख्या उपक्रमातून मिळतो. तसेच व्यवसाय करणे सोप नसून पात्र शिक्षण, नेतुत्व करण्याचे धाडस, जबाबदारी, व्यवसायाची सुरक्षितता आणि वेळोवेळी करावी लागणारी सुधारणा या बाबी व्यवसाय क्षेत्रात महत्वाच्या ठरतात. त्याच बरोबर उत्पादनाची जागरूकता, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, नेहमी सकारात्मक विचार यांचा पाया खूप भक्कम असला पाहिजे त्याशिवाय व्यवसायाची इमारत उभारने अवघड आहे. तसेच व्यावसायिक शिक्षण झाले म्हणजे व्यवसाय करू शकतो असे नाही. तर अनुभव देखील महत्वाचा आहे असे मत विद्यापीठाचे माजी मॅनेजमेट कोन्सील मेंबर दिपक पाटील यांनी व्यक्त केले.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयामधील रायसोनी मंडी-२०२३ च्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक विभागाचे प्रा. डॉ. एस. एन निंभोरे, विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक कोरस संचेती व एमबीएचे माजी विध्यार्थी व दायमा मार्केटिंगचे संचालक राहुल दायमा उपस्थित होते. उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजारात जाऊन अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम रायसोनी मंडीतून प्राप्त व्हावे या हेतूने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयामध्ये रायसोनी मंडी २०२३ या उपक्रमाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू विक्री आणि अनुभव कथन या पद्धतीने हा उपक्रम संपन्न होणार आहे. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी मंडीच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.

मुख्यतः बिजनेस मॅनेजमेट हा विषय वर्गात थेरी शिकवण्याबरोबरच बाहेरच्या वातावरणात जात तेथील विविध प्रात्यक्षिक ज्ञान घेणारा विषय आहे. रायसोनी मंडी या उपक्रमातून विध्यार्थी “लर्निग बाय सेलिंग” शिकतात म्हणजेच कि विध्यार्थ्यांना यातून अर्थशास्त्र, अकाउंट, नियोजन, डीसीजन मेकिंग यासारखे विविध विषय शिकता येतात तसेच शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर नोकरीची शोधाशोध व्हायला नको, व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी अनुभवातून घडावेत, ग्राहकांच्या गरजांची जाणीव समजून घेणे महत्वाचे आहे. वस्तूचे महत्व जाणून बाजारात उतरावे. तसेच आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, या गुनांसह व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे असून प्रत्यक्ष विक्रीचे अनुभव मिळावेत या उद्देशाने रायसोनी मंडी हा तीन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले. या उपक्रमातून विद्यार्थी फक्त विक्री आणि व्यवस्थापन शिकत नसून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांची मानसिकता जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

एक लाखाच्या वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असून २०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. उत्पादन विक्रीच्या माध्यमातून मिळणारा पैसा सामाजिक उपक्रमांसाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण व आरोग्यासाठी दिला जाणार आहे. बिजनेस करताना व्यवस्थापन अगोदर करावे, आपण निर्माण करीत असलेल्या उत्पादनाची बाजारात स्पर्धेची पडताळणी करून मंडी आपल्यासाठी व्यावसायिक उपक्रम आहे. त्यातून ग्राहक सेवा, ग्राहकाची अपेक्षा व खरेदी-विक्री यातील परिश्रम महत्वाचा असतो. वस्तू विक्री करतांना तुमचा प्रेमळ स्वभाव देखील महत्वाचा ठरतो असे मत दिपक पाटील यांनी व्यक्त केले. तसेच व्यवसायाचे प्रात्यक्षिके घेण्याचे व्यासपीठ मंडी असून यात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना उत्पादन विक्रीचे प्रात्यक्षिक दाखवून काही वस्तू विकल्यात. यावेळी ऍडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, प्रा.योगिता पाटील, प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. परिशी केसवानी, प्रा. मोनाली शर्मा, प्रा. श्रेया कोगटा, प्रा. डॉली मंधान, प्रा. सरोज पाटील व आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी व आभार प्रा. तन्मय भाले यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.