जळगावात अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ऐन गणेशोत्सवात अन्न व औषध प्रशासनाने आपली सूत्रे जोरदार हलवत जिल्हाभरामध्ये एकूण 30 ठिकाणी तपासणी करून ६ आस्थापनांवर अचानक प्रत्यक्ष धाडी टाकल्या. यामध्ये 39 अन्न नमुने हस्तगत करण्यात आले असून ३ मिठाई दुकानांवर दंडात्मक तर ३ व्यावसायिकांचा अन्न व्यवसाय थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने आपले कामकाज चौक बजावत अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त संदीप पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सत्र सुरू केले असून, जिल्ह्यातील ६ आस्थापनांवर प्रत्यक्ष धाडी टाकल्या. यामध्ये बाबा स्वीट्स अँड नमकीन, एमआयडीसी, जळगाव, अंबिका स्वीट अँड बेकर्स, चाळीसगाव, नानक ट्रेडर्स, पाचोरा, जैन हेल्दी फूड, ऑटोनगर, जळगाव, गोविंद कोलते फुड्स, एमआयडीसी, जळगाव, जय हिंद ट्रेडिंग कंपनी, जळगाव या सहा आस्थापनांचा समावेश आहे.

सोबतच  जिल्हाभरात तीस  ठिकाणी तपासणी करून एकूण 39 अन्न नमुने अन्न व औषध प्रशासनाने हस्तगत केले. यामध्ये तेल, खवा, फरसाण व नमकीन, मिठाई, चना बेसन, तूप, वनस्पती, पॅकेजिंग मटेरियल यांचा समावेश आहे. असा सुमारे ४ लाख २३ हजार ४६२ रुपयांचा, ३ हजार १४० किलोग्रॅम अन्न नमुना साठा जप्त करण्यात आला असून यावर पुढील कारवाई सुरू आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रसिद्ध म्हणाल्या जाणाऱ्या रोहिणी स्वीट अँड फरसाण महाबळ जळगाव, अंबिका स्वीट्स अँड बेकर्स चाळीसगाव, गिरनार स्वीट्स चाळीसगाव या तीन आस्थापनांवर ‘खाण्यास योग्य तारीख न लिहिल्यामुळे’ दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर जैन हेल्दी फूड ऑटो नगर जळगाव, मधुरम स्वीट्स रिंग रोड, जळगाव, अंबिका स्वीट्स अँड बेकर्स, चाळीसगाव या तीन आस्थापनांवर अन्न परवाना नसल्यामुळे व अन्नसुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे अन्न व्यवसाय थांबवण्याच्या नोटीस बजावण्यात आलेली आहे.

जिल्हाभरात हे धाडसत्र सुरू असून अन्न व औषध प्रशासन आयुक्त संदीप पतंगे यांनी नागरिकांनाही सतर्क राहून सदर वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी नागरिकांनी त्या खाद्यपदार्थावर तो पदार्थ वापरण्याची अंतिम तारीख, अर्थात एक्सपायरी डेट नमूद केलेली आहे की, नाही हे तपासणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात अशा खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून याबाबत जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे आवाहन, सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांनी केले. या घटनांमुळे मिठाई विक्रेत्यांमध्ये जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.