सहा नगरपरिषदांतील नऊ जागांसाठी ६३.११ टक्के मतदान
सकाळी अल्प प्रतिसाद, दुपारनंतर मतदानात लक्षणीय वाढ
जळगाव : जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या सहा नगरपरिषदांतील १२ जागांच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. माघारीनंतर तीन जागा बिनविरोध ठरल्याने उर्वरित नऊ जागांसाठी शनिवारी दि. २० रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये नोंदणीकृत ३३ हजार ६६२ मतदारांपैकी २१ हजार २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाची टक्केवारी ६३.११ इतकी नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील वरणगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर, सावदा व यावल या सहा नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांत एकूण ३३ हजार ६६२ मतदार मतदानासाठी पात्र होते. सकाळी ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ ४.२६ टक्के मतदान झाले होते. ११.३० वाजेपर्यंत हा आकडा १४.५७ टक्क्यांवर, तर दुपारी १.३० वाजेपर्यंत २९.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
दुपारनंतर मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ३.३० वाजेपर्यंत ४६.५३ टक्के मतदान झाले, तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का ६० ते ७७ टक्क्यांच्या दरम्यान गेला. यावल नगरपरिषदेत सर्वाधिक ७७.६६ टक्के मतदान झाले असून, सावदा येथे ६८.२६ टक्के, वरणगावमध्ये ६९.४९ टक्के, पाचोरा येथे ६६.७० टक्के, अमळनेरमध्ये ५८.७९ टक्के, तर भुसावळ येथे ५१.२९ टक्के मतदान नोंदवण्यात आले.
महिला मतदारांचा सहभाग अनेक केंद्रांवर लक्षणीय ठरला. प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. एकूणच जळगाव जिल्ह्यात लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे चित्र मतदानाच्या वाढत्या टक्केवारीतून स्पष्ट झाले आहे.

