जैन व्हॅलीतून सोलर केबल चोरीप्रकरणी आरोपी अटकेत
जळगाव: शिरसोली येथील जैन व्हॅली एनर्जी पार्कमधून पी. व्ही. सोलर केबल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.

२७ जानेवारी रोजी जैन व्हॅली एनर्जी पार्क येथून २५० मीटर पी. व्ही. सोलर केबल चोरी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी कंपनीचे अधिकारी अविनाश बढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, फैजल रज्जाक पिंजारी (वय २५, रा. शिरसोली) याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून फैजल पिंजारीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


