डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा संघ विजेता
देशभरातून आठ संघांचा सहभाग, पहिल्याच प्रयत्नात जैन सुप्रिमोज संघाची बाजी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-3 भव्य पद्धतीने संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. संपूर्ण भारतातून आठ संघ या स्पर्धेत होते. त्यातील स्ट्राईकफोर्स संघाला अंतिम सामन्यात 3-2 अशा फरकाने नमवित निमाखात विजेतेपदाला ‘जैन सुप्रिमोज’ संघाने गवसणी घातली.
विशाखापट्टणम् येथील एसथ्री स्पोर्टस एरिना येथे डेक्कन प्रिमियर कॅरम लीग स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. जैन इरिगेशनच्या ‘जैन सुप्रिमोज’ संघात कर्णधार संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, गौतम भोई, एम. एस. के. हरिका, झैयद अहमद, नईम अन्यारी, रहिम खान, संघ व्यवस्थापक सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. तीन दिवसांमध्ये 165 सामने खेळविली गेलीत.
या सीझनमध्ये 12 लाखांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केले गेले. जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोजने डेक्कन प्रीमियर लिगमध्ये उत्कृष्ठ कौशल्य आणि टीमवर्क दाखवून प्रथम स्थान मिळवले. रोख पारितोषिक व भला मोठ्या चषकाने जैन सुप्रिमोज संघाचा सन्मान करण्यात आला. विजयी संघाचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जैन सुप्रिमोज संघाचे संघमालक अतुल जैन, जैन स्पोर्टस ॲकडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस ॲकॅडमीचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी कौतुक केले आहे.