आधुनिकता असली तरी आपली संस्कृती जपावीच : प्रा. शितल पाटील

0

 

लोकशाही जागर संस्कृतीचा

प्रत्येक स्त्रीला समाजाची बंधने पाळावी लागतात. आपले घर, नोकरी, समाज अशा त्रिकुटाला सांभाळत महिला जगत असतात. यातूनच महिला ही पुरुषांपेक्षा मल्टीटास्किंग वर्क करते, हे सहज लक्षात येते. सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे बऱ्याचदा कामांमध्ये समस्या निर्माण होत असल्या तरी आपण आपली संस्कृती जपायलाच हवी. ती जोपासली जाईल, सांभाळली जाईल याची काळजी घ्यावी. हे करत असताना आपण समाजाला काही देणं लागतो, हेही लक्षात ठेवावे. आपण समाजाला दिले तरच समाज आपल्याला ते परत देईल, असे प्रतिपादन नूतन मराठा महाविद्यालय येथील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका ॲड शीतल पाटील यांनी लोकशाहीच्या कार्यालयात केले.

 

दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात नवरात्रीनिमित्त जागर संस्कृतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संस्कृती संदर्भात समाजातील प्रतिष्ठित महिलांकडून विचार जाणून घेतले जात आहेत. काल दिनांक 30 सप्टेंबर रोजी त्याच्या प्राध्यापिका ॲड शितल पाटील, जळगाव पीपल बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री साठे आणि जळगाव पीपल बँक बचत गट विभागातल्या अनिता वाघ उपस्थित होत्या.

 

यावेळी बोलताना शितल पाटील म्हणाल्या, मी एक प्राध्यापिका असताना माझ्यासाठी विद्यार्थी घडवणे हीच माझ्यासाठी एक संस्कृती मी समजते. अध्यापिकेच्या भूमिकेत असताना आपले यशस्वी विद्यार्थी पाहण्यासारखे दुसरे समाधान नाही. स्पर्धेच्या युगामध्ये अलीकडची तरुण पिढी ही वाचन वाचनापासून वंचित आहे. त्यांना वाचनाची सवय लागावी, त्यांचा वाचनाकडे कल वाढावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासोबत आपण आपल्या रूढी परंपरांचे सोपस्कारही समजून-उमजून जपले पाहिजे. नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या घालून महिला आनंदी होतात, मात्र या प्रत्येक रंगाचा अर्थ समजून त्यानुसार विचारसरणी ठेवली तर नक्कीच नवरात्रीचेही महत्त्व वाढेल, असे त्या म्हणाल्या.

 

यावेळी बोलताना जळगाव पीपल बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री साठे यांनी सांगितले की, मी ज्या बँकिंग क्षेत्रात काम करते त्या माध्यमातून बचत गटाच्या अंतर्गत माझा अनेक महिलांची संपर्क येत असतो. त्यातून बऱ्याचदा महिलांकडे असलेल्या अज्ञानाचे फार वाईट वाटते. अलीकडच्या आधुनिकतेच्या काळात महिलांना असे अज्ञानी राहून चालणार नाही. तुमच्यातलं अज्ञान हाच सर्वात मोठा तुमचा शत्रू असून त्याला दूर सारले पाहिजे. तसेच महिलांना बँकेबाबत जाण असणे गरजेचे आहे. खरंतर ही काळाची गरज म्हटली तरी हरकत नाही. कारण बँक ही महिलांना एका मित्राप्रमाणे सहकार्य करते. त्यामुळे बँकेच्या चांगल्या सुविधांचा अधिकाधिक फायदा महिलांनी घ्यावा. जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन अर्थार्जनाला मदत होईल. सोबतच महिलांनी आपल्या कलांना वाव देणे गरजेचे आहे. आपण घरी जे काही बनवतो मग त्यात लोणचं असेल, चटणी असेल, काही शिवणकामातल्या गोष्टी असतील याची विक्री करता येणे महिलांनी शिकायला हवे. जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीत आपला मोठा हातभार लागेल. यातूनच तुम्ही एक सशक्त नारी म्हणून समाजापुढे उभे ठाकाल, असे त्या म्हणाल्या.

 

दरम्यान, पीपल बँकेच्या बचत गट विभागात कार्यरत अनिता वाघ यांनी सांगितले की, महिलांनी आजच्या काळात कुठलाही अन्याय कदापि सहन करू नये. स्त्रीने कणखर व्हायला हवं आपल्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य वापर करायला हवा. महिलेने स्वतःला कदापी बंदिस्त करू नये. त्यासोबतच सण उत्सव हे माणसासाठी असतात आपण उपवास करतो, यातून महिलांमध्ये क्षमता वाढत असते. पूजेतून आध्यात्मिक शक्ती वाढते. मात्र भक्तीसाठी शरीराची हेळसाण करून चालणार नाही. आपल्याला दिलेल्या काही सांस्कृतिक जबाबदाऱ्या या आपल्या भल्यासाठी देखील असतात, मात्र आधुनिकतेच्या काळात त्याचे स्वरूप बदलले आहे. त्यात बदल व्हावा हे देखील गरजेचेच आहे. कारण आजकालच्या पिढीला जर सणावाराचे महत्त्व सांगायला गेले तर ते याकडे दुर्लक्ष करतात, मात्र त्यांना आधुनिक स्वरूपात आधुनिक उदाहरण देऊन जर ते समजावून सांगितले तर तो सण आपोआप साजरा होतो. आणि यामध्ये ते मोठ्या उत्साहाने सहभागी होतात हे विशेष, असे त्या म्हणाल्या.

शब्दांकन राहुल पवार

Leave A Reply

Your email address will not be published.