लोकशाही संपादकीय लेख

तरुणाई अर्थात जेन झीशी संवाद साधण्याची आता स्पर्धाच सुरू झाली आहे. काँग्रेस जनता पार्टीचे नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू होऊन या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. जवळजवळ एक महिना सुरू असलेल्या या आंदोलनाची शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने सांगता झाली. परंतु 20 जुलै रोजी संसदेवर जो मोर्चा गेला होता, त्या मोर्चावर लाठीमार, अश्रुधूर, पॅलेट गनचा वापर असा अमानुष प्रकार पोलिसांनी केला. परंतु या लाठीमार आणि गोळीबाराचे आदेश कुणी दिले, यावरून कवित्व सुरू आहे.
परंतु या लाठीमारात ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपये सरकारने अनुदान द्यावे, अशी केलेली मागणी जे. पी. नड्डा आणि धर्मेंद्र सिंह यांनी लेखी स्वरूपात मान्य केली होती. हे अनुदान देण्यासाठी आता सरकार तयार नाही. त्यामुळे येत्या 5 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे इंडिया गेटपासून काँग्रेस जनता पार्टीने आंदोलन जाहीर केले आहे. त्या आधी काँग्रेस जनता पार्टीने ‘देशामधील सरकारी स्कूल ठीक करो’ हे आंदोलन सुरू केले आहे. एकंदरीत तरुणाई आता शांत बसणार नाही, हे दिसून आले आहे. त्याचा परिणाम म्हणून तरुणांशी संवाद साधण्याचे काँग्रेसच्या वतीने अभियान सुरू झाले आहे.
देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत कोटा, देहरादून, प्रयागराज येथे ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम घेतला. त्यानंतर नुकताच महाराष्ट्रातील पुणे येथे मुलींशी संवाद साधला. त्याला मुलींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम फक्त मुलींसाठीच होता. मुलांना वेगळा मंडप टाकून तेथे टीव्ही स्क्रीन लावण्यात आले होते. या मुलींचा कार्यक्रम उत्स्फूर्त होता. परंतु त्यासाठी काँग्रेसने पैसे देऊन मुली आणल्या होत्या, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. परंतु तशी काही घटना घडल्याचे येथे आठवत नाही.
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आपणही आता कार्यक्रम आयोजित करावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे रेशीमबाग मैदानात अगदी तसाच मेळावा घेतला. त्या मेळाव्याची आणि राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची तुलना करावयाची झाल्यास, राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला कसलेही राजकारण नव्हते, तर नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या तरुणाई मेळाव्यात राजकारण पोतपोत भरलेले होते.
पुणे येथील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात मुलींना बोलते करण्याचा प्रयत्न दिसून आला. म्हणजे व्यासपीठावर सर्व स्तरांवरील एकेक मुलीने आपले मनोगत व्यक्त करावे, तसेच त्या असुरक्षित कशा आहेत, याबाबत चर्चा करीत होत्या. राहुल गांधी त्यांचे म्हणणे ऐकत होते आणि मध्ये-मध्ये त्यांना मार्गदर्शन करत होते. तसाच प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मेळाव्यात आढळून आला नाही. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आपल्या वैयक्तिक राजकारणाची दिशा काय होती, हे व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर एकही राजकीय व्यक्ती उपस्थित नव्हती. त्या उलट नागपूरच्या मेळाव्यात व्यासपीठावर राजकारण्यांची रीघ लागलेली होती.
पुणे मेळाव्यात मुलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. राहुल गांधींच्या वाक्यागणिक टाळ्या वाजवून घोषणा दिल्या जात होत्या, तर नागपूरला ढोल-ताशांचा गजर करणारी टीम आणलेली होती. नागपूरच्या व्यासपीठावर क्रिकेटमधील सेलिब्रेटी तिलक वर्मा यांना गर्दी जमवण्यासाठी आणण्यात आले होते. तसा प्रकार पुणे येथे मुळीच दिसून आला नाही.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येईल, असे आताच जाहीर करण्यात आले आहे. अशा प्रकारे देशात तरुणांशी संवाद साधणारे किमान 500 कार्यक्रम घेण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. तर केंद्र सरकारच्या वतीने जेन झीशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठाशी संवाद साधण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर भाजपची जी नवीन केंद्रीय कार्यकारिणी आहे, त्यात स्वतः अध्यक्ष नितीन नवीन, पक्षाचे महामंत्री विनोद तावडे व स्मृती इराणी यांना जेन झीशी संवाद साधण्याचा कार्यक्रम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एकंदरीत काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर भाजप नेते फक्त सतर्क झाले आहेत. आगामी 2019 च्या निवडणुकीत जेन झी आपल्या बाजूने कसे वळतील, त्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी तरुणांशी संपर्क साधला. त्यात तरुणाई हे या देशाचे भवितव्य असल्याने ते जर शांततेच्या मार्गाने निदर्शने करत असतील, तर त्यांना प्रतिबंध करता कामा नये, असा संदेश देऊन तरुणाईविषयी एक प्रकारे सहानुभूतीच व्यक्त केली. हा संदेश भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडेही गेला आणि त्यानंतर तरुणाईविषयी केंद्राची धारणा बदलली.
सुरुवातीला काँग्रेस जनता पार्टीने जे आंदोलन केले होते, ते फारच हलक्या पद्धतीने घेतले गेले. एक महिना झाला तरी त्यांच्याशी संवाद साधण्याची भूमिका केंद्राने घेतली नाही. शेवटी जो दणका बसला, तेव्हा त्यांना तडजोड करावी लागली. मग जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना बोलणी करण्यासाठी पाठवण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘हॅलो फ्रेंड्स’ अशी नवी नम्र भाषा घेतली. तरुणाईच्या या विजयामुळे आता त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये धडपड सुरू झाली आहे.


