जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अंतर्राष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), जळगावतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे भव्य आयोजन शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. आदित्य फार्म, अजंता रोड, एमआयडीसी, जळगाव येथे सायंकाळी ७ वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाची सुरुवात सायंकाळी ७ वाजता हरे कृष्ण भक्तवृंदाच्या संकीर्तनाने होईल. रात्री ८ वाजता श्रीकृष्ण जन्मकथेचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता श्रीकृष्णांचा अभिषेक, १०८ भोगार्पण आणि झुलादर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. मध्यरात्री १२ वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित या महोत्सवात भाविकांना भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा अनुभव घेता येणार आहे. संकीर्तन, जन्मकथा, सांस्कृतिक कार्यक्रम, अभिषेक आणि महाआरती या धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे. इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या व्यासपूजेच्या निमित्ताने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हरे कृष्ण मंदिर, इस्कॉन जळगाव, मंत्री पार्क, मन्यारखेडे शिवार, जळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी वैष्णव भजन व कीर्तन, शब्दांजली, ५६ भोग, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही धार्मिक कार्यक्रमांना जळगाव शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रील प्रभुपाद व्यासपूजा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.


