लोकशाही संपादकीय लेख
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील जळगाव जवळील बांभोरी गावानजीक गिरणा नदीवरील जीर्ण पूल वाहतुकीस योग्य आहे. का? त्याचे स्ट्रक्चरल ऑर्डर झाले आहे. का? या पुलाचा धोका ओळखून या पुलावरून वाहतूक थांबवली आहे. का? या सर्व प्रश्नांची उत्तर नाही असे आहे.. काल गुजरात राज्यात असाच एक जीर्ण झालेला पुलाचा भाग कोसळून अनेक वाहने नदीत पडली. यामध्ये अनेक जणांचा मृत्यूही झाला. तशा प्रकारची दुर्घटना बांभोरी येथील गिरणा नदीवरील पुलासंदर्भात होण्याची वाट संबंधित प्रशासनाचे अधिकारी पाहत आहेत. का? या प्रश्नाचे उत्तर देणार कोण? महामार्गाचे प्रकल्प संचालक एक शब्द बोलायला तयार नाहीत. पाळधी ते तरसोद या 16 किलोमीटरच्या महामार्गाला व्हायला आणखी दोन महिने वाढीव मुदत दिली गेली आहे. त्यानंतर तो बायपास सुरू होईल की नाही? हे देखील सांगणे कठीण आहे. त्यामुळे बांभोरी पुलाच्या प्रश्नाबरोबरच पाळधी ते तरसोदे जळगाव शहरातील महामार्गावर वाहतुकीची कोंडी तर होतेच, पण वाढत्या अपघाताला चालना मिळून त्यात किड्या मुंग्यांसारखे लोक चिरडले जात आहेत. हा प्रश्न सुद्धा अत्यंत बिकट आहे. एक दिवस सुद्धा कोरा जात नाही की ज्या दिवशी या महामार्गावर अपघात होत नाहीत. अपघाताची मालिका थांबत नसल्याने जळगाव शहरातील लोकांच्या जीवावर हा महामार्ग बेतला आहे. अपघातात ज्यांचा जीव जातो, त्यांनाच त्याची गंभीरता कळते. अपघात नियंत्रणासाठी किंवा अपघात होऊ नये म्हणून जी शासकीय यंत्रणा आहे, त्यांना त्याचे सोयरे ना सुतक. पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. 50 लोक जखमी झाले. नदीमध्ये वाहून गेले त्यांचा शोध घेणे सुरू आहे. हा पूल जीर्ण झाला असला तरी या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश शासनाने, पर्यायाने संबंधित शासकीय यंत्रणेने दिले असते तर चार लोकांचे जीव वाचले असते. 50 लोक जखमी झाले ते झाले नसते. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेच्या मृत्यूचा सुकाळ झालाय, असाच होतो. शासनाला तसेच शासकीय यंत्रणेला त्याचे काहीही वाटत नाही. गेंड्याची कातडी ओढलेल्या शासनाला काहीही वाटत नाही. तसाच काहीसा प्रकार गिरणा नदीवरील बांभोरी येथील पुलाच्या संदर्भातही म्हणता येईल. प्रसार माध्यमांनी या संदर्भात वेळोवेळी या धोकेबाज पुला संदर्भात प्रकाश टाकला आहे. परंतु त्याचेही त्यांना काही वाटत नाही..
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या राहत्या गावातून ते जळगाव शहरात याच पुलावरून ये-जा करतात. तथापि या पुलाच्या जिर्णोद्धाराचे संदर्भात त्यांना काहीच वाटत नाही का? पाळधी ते तरसोद हा महामार्गाच्या बायपासला तारीख पे तारीख मुदतवाढ देऊन मुदत वाढीची गिनीज बुकात नोंद केली जाईल, परंतु बायपास वेळेवर होत नसल्याने अनेकांचे अपघातात बळी जात आहेत. त्याचे पालकमंत्र्यांना काही वाटत नाही का? पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे पालक असताना त्यांची संवेदनशीलता गेली कुठे? गिरणा पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट का केले जात नाही? त्याला अधिकारी लोक टाळाटाळ का करतात? पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर जनतेला कोण देणार? दुर्घटना झाल्यानंतर शोक करत बसण्यापेक्षा दुर्घटना होणार नाही याची काळजी घेणे काही गैर आहे का? जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत. एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत. जिल्ह्यातील इतर आमदार, खासदार यांची संवेदनशीलता गेली कुठे? आमदार भवनातील कॅन्टीनमध्ये खराब जेवण मिळाले म्हणून कॅन्टीन मधल्या गरीब वेटरला मारहाण करणारे बुलढाण्याचे आमदार संजय शिरसाट यांनी महामार्गाच्या सदोषतेमुळे अपघातात लोक किड्या मुंग्यांसारखे चिरडले जातात याविषयी आवाज कधी उठवायला नको का? राजकीय लोकप्रतिनिधी जनतेच्या मतदानावर निवडून जातात. प्रतिवर्षाला राजकारणाच्या माध्यमातून गले लठ्ठ पैशाची कमाई करतात. हे करत असताना किमान सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार तरी की करायला नको का? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीतच राहते…!