लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून ती नियंत्रणात आणण्याबाबत जळगाव पोलीस अपयशी आहेत, असा प्रश्न काही आमदारांनी उपस्थित केला होता. त्यावेळी पाचोर्यात भर दिवसा बस स्थानक परिसरात बंदुकीच्या फैरी झाडून एकाचा खून झाला होता. मुक्ताईनगर मध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुंडांना पोलिसांचे सहकार्य मिळते, असा आरोप पाचोराचे आमदार किशोर पाटील आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी करून प्रश्न उपस्थित केला होता. हा विषय त्यावेळी चांगलाच गाजला होता. त्यानंतर जामनेर येथे पळासखेडाच्या तरुणावर सामूहिक रित्या अमानुष मारहाण करण्यात आली होती. ते प्रकरण देखील चांगलेच गाजले. यावल येथील एका बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अत्याचार करून त्याला जाळून टाकल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. अशी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची उदाहरणे देता येतील. परवा आणि काल जळगाव नजीक असलेल्या कुसुंबा गावात रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास सात आठ जणांच्या जमावाने एका कुरियर वाल्याच्या घरावर बेछुट गोळीबार केल्याची खळबळजनात घटना घडली. तसेच काल रात्री भुसावळ शहरात जळगाव शहरातील एका 40 वर्षीय मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाचा तीन जणांनी मिळून खून केला. वरील दोन्ही घटनांपैकी कुसुंबा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना तर भुसावळ येथील खून प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. ही सर्व गुन्हेगारीची मालिका पाहता जिल्ह्यातील गुन्हेगारी करणाऱ्यांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असे म्हणावे काय? ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यामागची कारणे काय आहेत? याचा शोध घेण्याची गरज आहे, असे पोलिसांना वाटत नाही का? गोळीबार करण्यासाठी बंदुकीचा वापर म्हणजे आजकाल दिवाळीत लुटूपुटुचे फटाके फोडणाऱ्या बंदुकीसारखा केला जातो. या गुन्हेगारांकडे या बंदुका येतात कुठून? त्याला परवानगी दिली जाते की बेकायदेशीर मार्गाने त्या बंदुका शहरात शेजारच्या राज्यातून येतात? यावर प्रतिबंध कसे घालायचे, याची काही योजना जळगाव पोलिसां जवळ नाही का? बेकायदा बंदूक शेजारच्या मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने जळगावत येतात कसे? जळगाव पोलिसांनी त्याचा छडा लावू नये का? त्याचा छडा लावला तर चोरट्या मार्गाने येणारी शस्त्रे येणार नाहीत.
गुन्हेगारी वाढण्याचे कारण काय? जळगाव जिल्ह्यातील पोलीस खाते त्याला जबाबदार आहे. मुक्ताईनगर मध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुंडाला तेथील पोलीस निरीक्षकाचे सहकार्य होते, असा आरोप देखील आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसच जर गुन्हेगारी झाले, तर गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढणार नाही का? जळगाव शहरातील एक ताजे उदाहरण म्हणजे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रमुखांनी एका महिलेची फसवणूक करून तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर महिलेकडून लग्नाचा आग्रह धरला गेला, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्या महिलेने संबंधित पोलीस निरीक्षकाच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीशी विचारणा केली तर त्या पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने सदर पीडित महिलेला जे नवऱ्या विषयी सांगितले ते भयानक होते. माझ्या नवऱ्याबाबत आणखी चार-पाच महिलांनी असेच सांगितले आहे. मी स्वतः परेशान आहे. हे प्रकरण चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळात सविस्तर सांगितले. सदर पोलीस निरीक्षकाने मंगेश चव्हाण यांना ‘गोळी घालून ठार करेन’ असा दम दिल्याचे स्वतः मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंत्र्यांसमोर आणि जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकां समोर सांगितले. या पोलीस अधिकाऱ्याचे वरपर्यंत संबंध आहेत. माझे कुणीही वाकडे करू शकत नाही, असाही दम दिल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कथित केले आणि आश्चर्य म्हणजे दिवसभर तक्रार दाखल करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये बसलेल्या महिलेने संध्याकाळी तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. परंतु मंगेश चव्हाण यांचे गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याने महिलेच्या फिर्यादी विना त्याला निलंबित केले. तो त्या निलंबनातून लवकरच मुक्त होईल. एकूणच कुंपणच शेत खातंय, अशातला हा प्रकार आहे का? त्यामुळे गुन्हेगारी वाढते आहे का? हा खरा प्रश्न आहे..!

