लोकशाही विशेष लेख
आपला भारत देश हा विविधतेत एकतेचा सुंदर संगम आहे. विविध भाषा, जाती, धर्म, प्रांत, संस्कृती, परंपरा असतानाही भारतीय लोक एकाच राष्ट्राच्या छत्राखाली एकत्र व गुण्यागोविंदाने राहतात. या विविधतेमध्ये एकता टिकून ठेवणे ही एक मोठी जबाबदारी आहे. ही एकता सहज साध्य झाली नाही, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत या एकतेवर अनेक आघात झाले. मात्र सर्व आघात परतावून लावण्यास भारतीयांना यश आले आहे, हे सहज साध्य झालेले नाही यामागे अनेक देशभक्तांचे कष्ट, दूरदृष्टी आणि त्याग आहे. ३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी केलेल्या कार्याला अभिवादन म्हणून दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा केला जातो. या लेखामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेण्यात आला आहे.
आपला देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतानाच देशाचे विविध तुकडे होऊ पाहत होते. भारतात सुमारे ५६५ संस्थाने स्वतंत्र होती. या संस्थांना भारतात विलीन करणे हे एक मोठे आव्हान होते. काही संस्थांने भारतात सामील होण्यास तयार नव्हती, तर काहींना स्वतंत्र राष्ट्र होण्याची इच्छा होती. अशा परिस्थितीत देशाचे विविध तुकडे होण्याची दाट शक्यता होती. अशा बिकट परिस्थितीला आपल्या मुत्सद्देगिरी आणि दृढ निर्णयक्षमतेचा वापर करून भारताची एकात्मता, अखंडता अबाधित ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे बिस्मार्क म्हणून ओळखले जातात, किंबहुना बिस्मार्क पेक्षाही वाजवी असे व्यक्तिमत्व सरदार वल्लभभाई पटेल यांचे होते. त्यांनी भारताच्या राजकीय एकात्मतेची जी पायाभरणी केली तीच आजच्या भारताच्या संघराज्य रचनेचा मूलभूत पाया आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात मधील नडियाद येथे झाला. प्राथमिक शिक्षण करमसद येथे घेऊन पुढील शिक्षण त्यांनी पेडलाड, बडोदा व नडियाद येथे पूर्ण केले. विद्यार्थी दशेतच १८९१ साली त्यांचा विवाह जव्हेरबाई यांच्यासोबत झाला. परंतु यांची साथ सरदार पटेल यांना आयुष्यभर लाभली नाही. १९०९ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर १९१० साली सरदार पटेल बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. १९१३ ला भारतात वकील होऊनच परतले. १९१७ पासून महात्मा गांधीजींच्या प्रभावाने प्रभावित होऊन स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. १९१७- १८ साली खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व केले. गुजरातमध्ये खेडा, बोरसद आणि बारडोली येथील शेतकऱ्यांचे नेतृत्व करून इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणाचा विरोध केला. महात्मा गांधींनी १९२० साली सुरू केलेल्या असहकार चळवळीच्या वेळेस सरदार पटेल यांनी वकिली व्यवसायाचा त्याग करून पूर्णवेळ स्वातंत्र आंदोलनात उडी घेतली. १९२१ मध्ये सरदार पटेल गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. यानंतर सरदार पटेल यांनी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी सत्याग्रह केले. त्यात त्यांना यश सुद्धा आले. त्यामुळे सर्व भारतभर सरदार पटेलांच्या कार्याचे कौतुक होऊ लागले. पुढील काळात सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनात दरम्यान त्यांना अनेक वेळा अटकही करण्यात आली होती.
भारत शेकडो वर्षाच्या काळोख्यातून प्रकाशाकडे वाटचाल करीत असताना भारतासमोर समस्यांच्या डोंगर उभा होता. फाळणी मुळे झालेल्या दंगली, निर्वासितांचे प्रश्न परंतु या समस्यांपेक्षाही महाभयंकर समस्या होती. ती म्हणजे संस्थानांचे विलीनीकरण करून त्यांचे एकीकरण घडवून आणणे. जवळपास ५६५ संस्थाने भारतात होती या संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून भारताचे एकीकरण घडून आणणे ही समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची होती. कारण तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंट बॅटन यांनी ३ जून १९४७ रोजी एक योजना जाहीर केली. या योजनेत त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश भारत सोडून गेल्यानंतर संस्थानिकांनी काय करायचे याबाबतचे तीन पर्याय सांगितले होते. १) ब्रिटिश सत्ता सोडून गेल्यानंतर संस्थानिकांनी ‘ जैसे थे’ म्हणजे हवे तर स्वतंत्र रहावे. २) स्वतंत्र भारतात विलीन व्हावे. ३)किंवा स्वतंत्र पाकिस्तानात विलीन व्हावे.
लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या या घोषणेमुळे संस्थानिक स्वतंत्र होण्याची स्वप्न पाहू लागले. त्यामुळे भारताचे संघराज्य न होता विविध तुकडे होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात होता. भारताचे सार्वभौमत्व अबाधित राहिले पाहिजे यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून भारताचे एकीकरण घडून आणण्यास प्राधान्य दिले. ही समस्या सोडविण्यासाठी त्यांनी “संस्थान मंत्रालय” स्थापन केले. अध्यक्षपदी उपपंतप्रधान असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांची नियुक्ती केली व सचिव पदी व्ही. पी. मेनन यांची निवड करण्यात आली. संस्थांची विलीनीकरण करण्याबाबतची नीती सरदार वल्लभभाई पटेल यांनी आखली. संस्थानिकांनी भारतात सामील का व्हावे ? यासाठी सरदार पटेल यांनी भावनात्मक आव्हान केले. ते म्हणाले की, ” भारतीय इतिहासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आज आपण उभे आहोत. यावेळी आपण सर्व एकत्र येऊन आपल्या देशाचे उज्वल भविष्य घडवू शकतो. आणि जर आपण संघटित झालो नाही तर आपल्याला नव्या संकटांना तोंड देण्याचा धोका पत्करावा लागेल. आपण एकसंघ होण्यातच आपल्या सर्वांचे समान हित आहे. अशावेळी आपण संघटित होण्याचे टाळले तर निर्माण होणारी अराजकता सर्वांनाच नष्ट करेल. आपल्या भावी पिढ्यांनी आपल्याला दोष देऊ नये म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन, वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून आपण संघटित होणे आवश्यक आहे. १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी संस्थानिकांनी भारतात सामील व्हावे.
याप्रमाणे सरदार पटेल यांनी एकीकरणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठ्या कौशल्याने, मुत्सद्देगिरीने व कणखर धोरणाचा अवलंब करून १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत जुनागड, हैदराबाद व कश्मीर वगळता इतर संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन केले.
हैदराबाद संस्थानाचा प्रमुख निजाम होता. याने भारतात सामील न होता सार्वभौम राहण्याचा निर्धार केला. तसेच त्याने रझाकार यांच्यामार्फत हैदराबाद मध्ये अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली होती. शेवटी सरदार पटेल यांचा संयम सुटला त्यांनी हैदराबाद मध्ये पोलीस कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे रझाकार व निजामाने शरणागती पत्करली ०१ नोव्हेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.
जुनागड हे संस्थान काठेवाड मधील असून चारही बाजूंने भारतीय प्रदेश होता. त्यातच जुनागड येथील शासक नवाबाने पाकिस्तानात सामील होण्याची घोषणा केली. त्यामुळे भारत सरकारच्या अडचणीत वाढ झाली. तसेच जुनागड नवाबाने तेथील प्रजेवर अन्याय अत्याचार केले. सरदार पटेल व पंडित नेहरू यांनी जुनागड वरती लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय लष्कराला घाबरून नवाब पाकिस्तानात पळून गेला. यानंतर जनतेने सुद्धा भारतात सामील होण्याचा निर्णय दिला. २० फेब्रुवारी १९४८ रोजी जुनागड संस्थान भारतात सामील करण्यात आले.
काश्मीर संस्थानाचे प्रमुख महाराजा हरीसिंह होते. यांनी भारतात किंवा पाकिस्तानात शामिल न होता स्वतंत्र राहण्याचा निर्धार केला होता. याकडे भारताने दुर्लक्ष केले. मात्र पाकिस्तानने काश्मीर आपल्या देशात सामिल झाला पाहिजे. यासाठी त्यांनी टोळीवाल्यांच्या साह्याने काश्मीरवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. या आक्रमणा पुढे महाराजा हरीसिंह हतबल झाले. त्यांनी भारताकडे मदतीची याचना केली. परंतु काश्मीर भारतात सामील झाल्याशिवाय आम्हाला मदत करता येणार नाही असे सांगितले, तेव्हा राजा हरीसिंह यांनी २७ ऑक्टोबर १९४७ रोजी सामीलीकरणाच्या करारपत्रावर सह्या केल्या. अशा रीतीने काश्मीर संस्थान भारतीय संघराज्यात सामील झाले.
अखंड भारताचे आधीच दोन तुकडे ब्रिटिशांनी केले असताना, संस्थानांचे सार्वभौम राहणे म्हणजे पुन्हा भारताचे विविध तुकड्यात रूपांतर होणार होते. ही सर्वात मोठी जटील समस्या सोडविण्याचे काम भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठ्या मुत्सद्देगिरीने सोडविली. कोणत्याही प्रकारचा रक्तपात न होऊ देता. संस्थांच्या विलीनीकरणाचे ध्येय त्यांनी सामोपचाराने साध्य केले. भारताच्या प्रादेशिक एकात्मतेचे, एकसंघतेचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकांसाठी सरदार पटेल यांनी केलेले कार्य हे खूप मोलाचे आहे. सरदार पटेल यांनी दाखवलेली चाणाक्ष मुत्सद्देगिरी व दूरदृष्टीमुळे आपला देश एकसंघ आहे. आज जेव्हा आपण भारतीय म्हणून एकसंघ राष्ट्रात अभिमानने राहत आहोत तेव्हा आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाची आठवण होते. त्यांनी दाखवलेल्या दृढतेमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे भारत एक झाला आहे.
त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणही देशातील ऐक्य, सलोखा आणि राष्ट्रभक्ती जोपासण्याचा प्रयत्न करायला हवा. हेच सरदार पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त खरे अभिवादन असेल.

सहाय्यक प्राध्यापक
सरदार वल्लभभाई पटेल कला
व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर