जळगाव : धरणगाव येथे एका इराणी महिलेला तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासह बेकायदेशीरपणे आश्रय देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आश्रय देणाऱ्या संशयितांनी थेट पाकिस्तानातील दोन व्यक्तींशी आंतरराष्ट्रीय व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बाबीस पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे.
तेहरान (इराण) येथील सदर विदेशी महिलेचा व्हिसा ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपुष्टात आला होता. मात्र, धरणगाव येथील एका दाम्पत्याने जानेवारी २०२५ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत तिला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला स्वतःच्या घरात आश्रय दिला. या वास्तव्याची माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आली असून सी-फॉर्मही भरलेला नव्हता.
या प्रकरणी गुरुवारी (८ जानेवारी) धरणगाव पोलीस ठाण्यात संबंधित इराणी महिला तसेच आश्रय देणाऱ्या दाम्पत्याविरोधात इमिग्रेशन व विदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत कलम ८ व २४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आश्रय देणाऱ्या दाम्पत्याला अटक केली. चौकशीत विदेशी महिलेला सीमकार्ड पुरविण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित संशयिताचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेत अटक केली आहे.
अटक केलेल्या संशयितांचे मोबाईल फोन हस्तगत करून तांत्रिक तपासणी करण्यात आली. कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल डेटाच्या विश्लेषणात संशयितांचा पाकिस्तानातील व्यक्तींशी थेट संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. सलमानभाई व सलमान खान नावाच्या व्यक्तींशी आंतरराष्ट्रीय व्हिडीओ कॉल व चॅटिंग केल्याचेही उघड झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इराणी महिलेला मदत कोणी केली, तिचे स्थानिक व आंतरराष्ट्रीय संपर्क कोण होते, तसेच आश्रय देण्यामागील नेमका उद्देश काय, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पाकिस्तानातील व्यक्तींशी झालेला संवाद लक्षात घेता हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात असून सर्व पातळीवर तपास सुरू असल्याची माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली आहे.