लोकशाही संपादकीय लेख
31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून सरदार वल्लभ भाई पटेल यांचा यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती. त्या निमित्ताने राज्यात तसेच देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 31 ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरुणांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांसारखे उपक्रम घेतले जाणार आहे.
सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री. त्यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जात होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी जळगाव शहरात आज युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकता पदयात्रा काढण्यात आली. यात तरुण-तरुणी, विद्यार्थी, सर्व पक्षाचे नेते आदी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून जी भूमिका पार पाडली त्याला तोड नाही. देशातील सर्व संस्था खालसा करून देश एकसंघ राहील, यासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्वात फार मोठे कार्य केले आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात काँग्रेस पक्षाची राजवट असली तरी देशाच्या अखंडतेसाठी सरदार पटेल यांना काँग्रेस बरोबर सर्वच पक्षाचे सहकार्य मिळाले. त्यांना काँग्रेस पक्ष म्हणून एक पक्षाच्या चौकटीत बसवता येणार नाही. ते काँग्रेस पक्षाचे असले, तरी आधी देशाचे नेते आहेत, असा त्यांच्यावर शिक्कामोर्तब होत होता. आज सरदार पटेल यांना जातीच्या भिंतीत अडकवू पहिले जात आहे. त्याचबरोबर ते गुजरातचे म्हणून त्यांना प्रादेशिक वादात अडकवले जात आहे. परंतु सरदार पटेल जात आणि प्रादेशिक वादापेक्षा ते देशाचे नेते म्हणून अधिक सन्माननीय आहेत. त्याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. ते लेवा समाजाचे म्हणून जरूर लेवा समाजाने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी .परंतु देशाचे सच्चे देशभक्त म्हणूनही त्यांचा आदर्श आणि प्रेरणा घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.
जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील अतूट मैत्री सर्वश्रूत आहे. देशाच्या हितासाठी देशाच्या विकासासाठी जळी-स्थळी-पाषाणी, रात्रंदिवस नेहरू आणि सरदार पटेल सतत विचारात मग्न असायचे. त्यांच्या काळात जातीयवादाला थारा नव्हता. देशातील सर्व समाज धर्माचे नागरिक हे देशाचे नागरिक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जायचे. जातीय वादाला थारा नव्हता. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. याचा अर्थ ते जातीयवादी नव्हते हे स्पष्ट होते.
परंतु अलीकडे त्यांना जातीयवादाच्या कोशात अडकवून बदनाम केले जात आहे. तसेच ते गुजरात राज्यात जन्मले म्हणून त्यांना प्रादेशिक वादात अडकवून त्यांचा फायदा उठवण्याचा प्रयत्न राजकीय नेते करीत आहेत. परंतु ते कुठेही जन्मलेले असले तरी ते एक सच्चे भारतीय नागरिक होते, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करत असताना आधी सरदार हे कोणत्या विचारांचे होते? त्यांची देशभक्ती कश्या प्रकार होती? हे जाऊन घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीनेच देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सरदार पटेल यांनी गुरुस्थानी मानले होते. कणखर विचारांचे म्हणून त्यांना लोहपुरुष असे संबोधण्यात येते असले तरी कोणत्याही निर्णय घेण्याआधी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी चर्चा करून घेत असत. महात्मा गांधींना एकदा सरदारांचा विचार पटला नाही. मात्र सरदार पटेल यांच्या मनात कसलाही दुजाभाव न ऐर्मान झाला नाही. गांधींवर त्यांची अपारनिष्ठा होती. परंतु अलीकडे भाजप मधील नेते राष्ट्रीय पित्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणण्याऐवजी त्यांना गोळ्या घालणाऱ्या नथुराम गोडसेंचा उदो उदो करून त्यांना हुतात्मा करण्याचा प्रयत्न होतो आहे. नथुराम गोडसे यांचा जरूर उदोउदो करा… परंतु राष्ट्रपित्याचे अवमूल्यन करण्याचा तुम्हाला अधिकार काय? देशात अशा प्रवृत्ती वाढत असताना सत्ताधारी नेते मूग गिळून चूप बसतात याचा अर्थ काय?
म्हणून सरदार पटेल यांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार अमलात आणले तर देशाच्या एकतेला तसेच अखंडतेला कसलाही धोका राहणार नाही. म्हणून तरुण पिढीला सरदार वल्लभभाई पटेल समजून घेण्यासाठी त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. हेच या निमित्ताने सरदार पटेल यांना खरे अभिवादन ठरेल..!