मन की बात
अवैध धंद्यांचा जो बाजार जळगाव जिल्ह्यात मांडला जात आहे तो येणाऱ्या काळासाठी धोक्याची घंटा ठरत असतांनाही त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. जिल्ह्याला मोठी नैसर्गिक साधन संपत्ती मिळाली असली तरी तीचा उपयोग केवळ अवैध व्यवसायासाठी होत आहे. सातपुड्याच्या जंगलातून होणारी लाकूड तस्करी असो वा मोठ्या प्रमाणावर होणारी वाळू तस्करी! या गंभीर विषयाकडे कुणाचेही लक्ष जात नाही असे नाही तर सर्वच ‘आर्थिक लाभार्थी’ असल्याने चिडीचुप बसले आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत रोज कुणाचा ना कुणाचा बळी जात आहे. सुसाट धावणारे हे डंपर नागरिकांच्या जिवावरच उठले आहे. महसूल विभागाच्या पथकावर हल्ले होत असतांनाही यंत्रणा इतकी गाढझोपत आहे की आरोपी मोकाट हिंडत आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्यांना वाळू तस्कर ‘आपल्या’ पद्धतीने धडा शिकवित आहेत. जिल्ह्यात चार मंत्री आहेत. मात्र एकाच्याही तोंडातून ‘ब्र’ शब्द निघत नाही. मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर निवडणुकीच्या काळात ‘नदीकाठचे लोक वाळू वाहणार नाहीत तर काय करतील?’ असे वक्तव्य करुन एकप्रकारे वाळू वाहतुकीला खतपाणीच घालण्याचे काम केलेे. ‘आपुल्या या हिता असे जो जागता’ हेच श्री. पाटील यांच्या वक्तव्याचे विश्लेषण करता येर्इल. तापी, गिरणा, अंजनी, पूर्णा यासारख्या महत्वाच्या नद्यांची अक्षरक्ष: चाळणी झालेली असतांनाही कुणीही आवाज उठवित नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
गेल्या आठवड्यात धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे धक्कादायक प्रकार घडला. गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. गिरणा नदीतील वाळू उपसा करण्यासाठी लिलाव झाला नसल्याने नदीतून वाळू उपसा करण्यावर बंदी आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांना धुडकावून वाळू माफिया रात्रीच्या अंधारात वाळूची वाहतूक करत आहेत. दरम्यान, वाळू माफियांकडून प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ही घटना या अवैध कारवायांचा भाग आहे ज्या रात्रीच्या अंधारात सुरू असतात. प्रशासनाला आता या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावी लागणार आहेत. तापी, गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रेती माफियांनी नद्यांचे अक्षरशः लचके तोडल्याचे चित्र पाहायला मिळते. प्रशासनाच्या वतीने या विरोधात कारवाया केल्या जात असल्या तरी त्या अतिशय नाममात्र असल्याने रेती मफियांनी आपले पाय घट्ट रोवले असल्याचे सिद्ध झाले आहे.
गिरणा नदीवर बांभोरी गावाजवळ असलेल्या पुला लगतच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याने या पुलाचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे रेती उत्खनन त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपलीच दाखविण्यात आली. या वाळू उत्खननातून अवैध रेतीचा दिवस रात्र मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने नदी पात्रातील रेतीचे प्रमाण कमी झाल्याने परिसरातील भूजल पातळीमध्ये मोठी घट झाली. त्यामुळेच दहा-दहा दिवस नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. विविध प्रकारचे जल किडे, मासे, शंख, शिंपले या उपशामुळे नष्ट झाल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. नागपूर-मुंबई महामार्गवरील पुलालगत वाळू उत्खनन सुरू असल्याने देखील पुलाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला असून पुलाच्या 500 मीटर आवारात कलम 144 लागू करण्यात आले असताना देखील या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरु असतांनाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेंड्यांची कातडी पांघरुन झोपी गेले आहे. बुधवारी कालिंका माता चौकात एका चिमुरड्याचा डंपरच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी डंपरला आग लावली असली तरी ही संतापाची आग अवैध वाळूच्या उपश्याला लावणे गरजेचे झाले आहे.
राजकीय आशिर्वादाशिवाय वाळू तस्करी होणे शक्यच नाही. लोकप्रतिनिधी व अधिकारी दोघांचेही संगनमत असल्यानेच हे अवैध उद्योग फोफावले आहे. अनेक डंपर, टॅक्टर यांचे परवाने, नंबर प्लेट नसतांनाही ते सुसाट धावत आहे. महसूल, पोलिस, परिवह विभाग जिल्ह्यात आहे की ‘अर्थकारणा’मुळे पुरता ‘विकला’ गेला आहे. शहरातून मार्गक्रम करतांना शनिपेठ, शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, ए.पी. कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावरुन जावे लागते तरीही अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन या विभागातील कुण्याही अधिकाऱ्याला दिसत नाहीत, दिसले तरी त्याचा ‘हप्ता’ बांधलेला असल्याने त्याला हवा दिली जाते. दैनंदिन जीवन जगत असतांना लोकांना रस्त्यावरु चालतांना जीव मुठीत घेवूनच मार्गक्रम करावे लागत आहे. एकंदरीत काय तर लोकप्रतिनिधींचे हात बरबटलेले अन् अधिकाऱ्यांचे हप्ते बांधलेले! असेच आहे.

मो. ९९६०२१०३११