तुरुंगात असलेल्या आरोपीचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु

सक्षम ताटे प्रकरण : भडक गाणी, आक्षेपार्ह, चिथावणीखोर कॅप्शन

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून नांदेड येथील सक्षम ताटे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अंतरजातीय प्रेम प्रकरणामुळे प्रेयसीचे वडील आणि भावांनी मिळून सक्षम ताटेची हत्या केली. त्याला भेटायला बोलावून पहिले त्याला गोळी घातली आणि नंतर डोक्यात लादी घालून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणातील मुख्य आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी जेलमध्ये असताना एका आरोपीबाबात मोठी माहिती समोर आली आहे.

आचल मामीडवार हिचे सक्षमवर जीवापाड प्रेम होते. पण कुटुंबीयांना मात्र ते मान्य नव्हते. सक्षम हा आंचलच्या भावांचा मित्र होता. सुरुवातीला आंचलच्या छोट्या भावाला त्यांच्या प्रेम प्रकरणाविषयी कळाले. नंतर मोठ्या भावाला कळाले. दोघांनीही आंचलला मारहाण केली आणि सक्षमला विसरुन जाण्यास सांगितले. मात्र, आंचल तिच्या मतावर ठाम राहिली. एक दिवस अचानक आंचलला सकाळी कळाले की वडील आणि भावांनी सक्षमची हत्या केली. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणातील आठ आरोपींना अटक केली. आता या आठ पैकी एका आरोपीबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तुरुंगात असलेल्या एका आरोपीचे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु आहे. त्याने संबंधित अकाउंटचे नाव ‘हिमेश मामीडवार 302’ (हिम्या शूटर) असे असून, प्रोफाइल फोटोत आरोपीच्या हातात बेड्या घातलेला फोटो आहे. अकाउंटवर पोलिसांसोबत हातात हात धरलेले फोटो पोस्ट केले आहेत. शिवाय प्रत्येक पोस्टवर भडक पंजाबी गाणी आणि आक्षेपार्ह, चिथावणीखोर कॅप्शनचा वापर करण्यात आला आहे. अटकेनंतरही या पोस्ट्सवर अनेक आक्षेपार्ह कमेंट्स आल्या आहेत. पोलिस कोठडीत असतानाही हे अकाउंट सुरू असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरोपीचे अकाऊंट पाहिल्यानंतर पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुरुंगात असलेला आरोपी सोशल मीडियावर कसा सक्रिय असू शकतो? हे अकाउंट स्वतः आरोपी चालवत आहे की दुसरे कोणी, असा संशय निर्माण झाला आहे. यामुळे प्रकरणात नवे वळण आले असून, पोलिसांकडून याची चौकशी होत असल्याचे म्हटले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.