इंडिगोची १ हजाराहून अधिक उड्डाणे रद्द ; प्रवाशांचे हाल
विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड धावपळ, रांगा
नवी दिल्ली वृत्तसंस्था देशातील सर्वात मोठी विमान सेवा असलेल्या इंडिगोसमोर गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला अभूतपूर्व गोंधळ अधिक तीव्र झाला असून, शुक्रवारी तब्बल १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. गुरुवारीच ५५० उड्डाणे रद्द झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड धावपळ, रांगा आणि अनिश्चिततेने परिस्थिती अधिकच बिकट बनली.
इंडिगोच्या वेळापत्रकात झालेला हा मोठा कोसळा विमान चालक दलाच्या कमतरतेसह अंमलात आलेल्या नवीन ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स’ (FDTL) नियमांमुळे झाल्याचे सांगण्यात आले. या नियमांमुळे चालक दलाची तैनाती आणि विश्रांती कालावधीत मोठे बदल करावे लागत असल्याने अनेक उड्डाणांचे नियोजन कोलमडले. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि देशभरातील विमानतळांवरील गोंधळ लक्षात घेऊन केंद्र सरकारने इंडिगोला या नवीन नियमातून तात्पुरती सूट दिल्याची घोषणा केली. त्यानंतर इंडिगोने सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले.
दिल्ली विमानतळावर स्थिती सर्वाधिक गंभीर राहिली. येथे मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे थांबवण्यात आली असून, २२o हून अधिक उड्डाणे रद्द झाली. बंगळुरू विमानतळावर १०० हून अधिक, तर हैदराबादहून ९० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवासी ताटकळत पडले. अनेकांनी शेवटच्या क्षणी उड्डाण रद्द झाल्याचा मनस्ताप व्यक्त केला असून, काही ठिकाणी प्रवासी–कर्मचारी वादाचे प्रकारही घडले आहेत. अनेक प्रवासी २४ तासांहून अधिक काळ विमानतळांवर अडकून असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
इंडिगोने ‘तांत्रिक अडचणी, हिवाळी वेळापत्रकातील बदल आणि नवीन ड्युटी नियम’ यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु डीजीसीएने चुकीचे नियोजन व योग्य पूर्वतयारीचा अभाव हेच या व्यापक गोंधळाचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थिती पूर्णपणे सुरळीत करण्याचे आश्वासन डीजीसीएला दिले आहे.
दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी नियंत्रण कक्षाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. डीजीसीएने संपूर्ण नेटवर्कवर बारीक लक्ष ठेवावे आणि इंडिगोने सेवा शक्य तितक्या लवकर सामान्य कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.