भारताने स्वदेशी आणि स्थानिक उत्पादनावर भर द्यावा -मोहन भागवत
आरएसएस शताब्दी विजयादशमी मेळाव्यात एकता आणि स्वावलंबनाची हाक
भारताने स्वदेशी आणि स्थानिक उत्पादनावर भर द्यावा -मोहन भागवत
आरएसएस शताब्दी विजयादशमी मेळाव्यात एकता आणि स्वावलंबनाची हाक
नागपूर लोकशाही न्युज नेटवर्क I
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी विजयादशमी मेळाव्यात नागपूर मुख्यालयावरून समाजाला एकतेचा, स्वावलंबनाचा आणि अहिंसक लोकशाही मार्गाचा संदेश दिला.
जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी अमेरिकेच्या अलीकडील आयात-शुल्क धोरणाचा उल्लेख केला. भागवत म्हणाले, “नवीन शुल्क धोरण अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी लागू केले असले, तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगभर जाणवतो. जग परस्परावलंबनावर चालते, मात्र अवलंबित्व जबरदस्तीचे होऊ नये. भारताने स्वदेशी आणि स्थानिक उत्पादनावर भर द्यावा. तसेच इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हे दडपणाखाली नव्हे तर स्वेच्छेने ठेवले पाहिजेत.”
यावेळी सरसंघचालकांनी शेजारील देशांतील अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली. नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील अलीकडील हालचालींचा संदर्भ देत ते म्हणाले, “शेजारी अस्थिरता भारतासाठी चांगली नाही. हिंसक लोकआंदोलनामुळे अराजक निर्माण होते, पण त्यातून खरा बदल घडत नाही. लोकशाही पद्धतीनेच खरी क्रांती साध्य होते. उथळ किंवा हिंसक मार्ग अव्यवस्था निर्माण करतात, परंतु परिस्थिती पूर्ववतच राहते. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी काही शक्ती देशाच्या आत आणि बाहेर सक्रिय आहेत.”
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात विविधतेत एकतेचा स्वीकार करण्याचे आणि स्वावलंबनाचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन करत लोकशाही व शांततेच्या मार्गानेच परिवर्तन साधण्याचा संदेश दिला.