बंडखोर अपक्षांनी वाढवले पक्षाच्या उमेदवारांची टेन्शन..!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात बंडखोर उमेदवार दंड थोपटून उभे असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारांचे टेन्शन वाढवले आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण १२ उमेदवारी अर्ज शिल्लक असून त्यापैकी ६ विविध पक्षातर्फे आणि ६ अपक्ष उमेदवार अर्ज आहेत. पाचोऱ्यात विद्यमान शिवसेना आमदार किशोर पाटील हे शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांच्यात प्रमुख लढत असेल तरी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी तसेच शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे दिलीप वाघ हे दोघे पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष लढत असल्याने विद्यमान आमदार शिंदे सेनेचे किशोर पाटील यांचे चांगलेच टेन्शन वाढवले आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात आमदार किशोर पाटील, वैशाली सूर्यवंशी, अपक्ष अमोल शिंदे आणि अपक्ष दिलीप वाघ यांच्या चौरंगी लढत आहे.

जळगाव शहर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार राजू मामा भोळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जयश्री महाजन यांच्यात प्रमुख लढत असली तरी भाजपचे माजी महापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी केल्याने राजू मामांचे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे अपक्ष लढत असल्याने जयश्री महाजन यांचे टेन्शन वाढवले आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार असली तरी माजी आमदार भाजपचे शिरीष चौधरी यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मंत्री अनिल पाटील यांचे टेन्शन वाढवले आहे. त्यानंतर एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमाणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सतीश पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार असली, तरी माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांचे चांगलेच टेन्शन वाढवले आहे.

त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हर्षल पाटील यांनी तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर संभाजी पाटील यांनी केलेल्या अपक्ष उमेदवारीमुळे अनुक्रमे अमोल पाटील आणि डॉक्टर सतीश पाटील यांना डोकेदुखी ठरणार आहे. एकंदरीत पाचोरा-भडगाव, जळगाव शहर, अमळनेर, एरंडोल-पारोळा या चार विधानसभा मतदारसंघात बंडखोर अपक्ष उमेदवारांनाच प्रमुख पक्षाचे उमेदवारांचे टेन्शन वाढणारे वाढविणारे आहे.

११ पैकी इतर ७ मतदार संघात जामनेर विधानसभा जळगाव ग्रामीण, भुसावळ, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात सरळ लढत होणार आहे. या सरळ लढतीमध्ये कोण बाजी मारतो? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संकटमोचन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे विरोधात गिरीश महाजन यांचेच समर्थक कार्यकर्ते जळगाव जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मैदानात उडी घेतली असून दिलीप खोडपे यांनी गिरीश महाजन यांच्यासमोर खरोखर आव्हान निर्माण करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे जिल्ह्याचे नव्हे, तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघात विद्यमान पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील विरुद्ध माजी पालकमंत्री शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यातील सरळ लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेना गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यात प्रतिष्ठेची लढत होणार आहे. रोहिणी खडसेंचा २०१९ मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी निसटता पराभव केला होता त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत रोहिणी खडसेंचे वडील एकनाथ खडसेंच्या अस्तित्वाची लढाई म्हणता येईल. चोपडा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवार असून त्यांचे विरुद्ध भाजपचे माजी जिल्हा परिषद सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांच्यात सरळ लढत होणार आहे. तिसऱ्यांदा चंद्रकांत सोनवणे यांची कुटुंबीयांची आमदारकी राहते की प्रभाकर सोनवणे हा डाव हाणून पाडतात? याकडे लक्ष लागून आहेत. रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी आणि भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे यांची सुपुत्र अमोल जावळे यांच्यात सरळ सामना होत आहे. यंदा या दोघांपैकी कोण बाजी मारतो? हे बघणे उत्सुकतेचे राहील.

प्रहार जनशक्तीचे भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रहार जनशक्तीतर्फे मैदानात असून तिरंगी सामन्यात ते किती मते खेचून घेतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघात एकदा राष्ट्रवादी आणि दोनदा भाजपतर्फे विधानसभेची निवडणूक लढवून आमदार झालेले संजय सावकारे यांच्या विरोधात भुसावळ शहरातील एक नामांकित डॉक्टर मानवतकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत. आमदार संजय सावकार यांची चौथ्यांदा आमदारकी रोखण्यात डॉक्टर मानवतकरांना यश येते का? याची भुसावळकरांना उत्सुकता लागलेली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील ४ मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचे टेन्शन तर ७ मतदारसंघात सरळ सरळ लढतीमध्ये जो कोण बाजी मारतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.