लोकशाही न्यूज नेटवर्क

पिकांची उत्पादकता वाढवितानाच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक व अधिक कार्यक्षम नॅनो खतांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
इफको संस्थेच्या “नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे”चा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील गावोगावी नॅनो खतांचा प्रचार-प्रसार तसेच नॅनो डीएपी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
सध्याच्या जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, तसेच ‘अलनिनो’सारख्या हवामान बदलाच्या संकटांच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत आणि उत्पादनक्षम ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर यांसारखी खते कमी प्रमाणात वापरूनही अधिक परिणामकारक ठरतात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्हा हा रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, पारंपरिक युरियाचा अतिरेक आणि अशास्त्रीय वापर जमिनीच्या आरोग्यासह पाण्याच्या गुणवत्तेलाही धोका निर्माण करत आहे. युरियाच्या विघटन प्रक्रियेमुळे तयार होणारे नायट्रेट घटक जमिनीतून झिरपून भूगर्भातील पाण्यात मिसळतात, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण वाढत असल्याची बाबही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
तसेच, युरियाच्या वापरातून निर्माण होणारे अमोनिया व नायट्रस ऑक्साईडसारखे वायू वातावरणात मिसळून हवेचे प्रदूषण वाढवत असल्याने पारंपरिक खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शिफारस केलेल्या मात्रेत व शास्त्रीय पद्धतीने खतांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या समस्यांवर उपाय म्हणून विकसित करण्यात आलेले ‘नॅनो युरिया’ हे द्रवरूप खत अत्यंत सूक्ष्म कणांद्वारे पिकांना थेट उपलब्ध होते. पानांद्वारे शोषले जाणारे हे कण पिकांच्या गरजेनुसार कार्यरत राहतात, त्यामुळे त्याची कार्यक्षमता सुमारे ९० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. याउलट पारंपरिक युरियाची कार्यक्षमता केवळ २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहते.
यावेळी शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात किमान २५ टक्के पारंपरिक खतांचा वापर कमी करून नॅनो खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन करण्यात आले. यामुळे जमिनीचे, पाण्याचे व हवेचे प्रदूषण टाळून शेती अधिक शाश्वत व पर्यावरणपूरक बनविता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के तसेच जळगाव जिल्हा परिषदचे अधिकारी आणि इफकोचे जिल्हा प्रतिनिधी संदीप रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


