लोकशाही न्यूज नेटवर्क
तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री झाकीर हुसेन यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाने 11 कोटी रुपयांहुन अधिक रोकड जप्त केली असून या नोटांचा ढीग पाहून अधिकारीही चक्रावले. हुसेन त्यांच्या घराव्यतिरिक्त मिलमधूनही ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून प्राप्तिकर विभागाच्या पथकाने झाकीर हुसेन यांच्या घरावर छापा टाकला होता.
हुसेन यांच्या दोन विडी कारखान्यांमधून साडेपाच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या रोख रकमेशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा झाकीर हुसेन यांनी केला आहे. पण प्राप्तिकर विभागाने त्यांची चौकशी सुरु केली आहे.
झाकीर हुसेन हे मुर्शिदाबादच्या जंगीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ममता बॅनर्जी सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. हुसैन यांच्या घरातूनच एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय तांदूळ आणि पिठाच्या गिरणीतून 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एकट्या मुर्शिदाबादमधून 11 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाने एकूण 28 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
“मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांच्या बाजूनेही मला पूर्ण सहकार्य मिळाले. माझ्याकडे असलेल्या रोख रकमेची सर्व कागदपत्रे आहेत. मी वेळोवेळी कर जमा करतो, त्यामुळे मला कशाचीही भीती वाटत नाही,” असे स्पष्टीकरण झाकीर हुसेन यांनी दिले .