लोकशाही न्यूज नेटवर्क

खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. डिझेल, ट्रॅक्टरचे सुटे भाग तसेच देखभाल खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने ट्रॅक्टर चालविणे अधिक खर्चिक बनले आहे. परिणामी आगामी काळात नांगरणी, वखरणी आणि इतर मशागतीच्या दरात वाढ करावी लागणार असल्याचे ट्रॅक्टर चालकांकडून सांगितले जात आहे. अलीकडेच डिझेलच्या दरात सुमारे तीन रुपयांची वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम शेती मशागतीच्या खर्चावर होत आहे. ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी शेतीची कामे डिझेलवर अवलंबून असल्याने दरवाढीचा आर्थिक भार शेवटी शेतकऱ्यांवरच पडणार आहे.
दुसरीकडे, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात मशागतीचे दर वाढल्यास खरीप हंगामाचा एकूण खर्च आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यास मशागतीची कामे वाढण्याची शक्यता असून ट्रॅक्टरची मागणीही वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे डिझेल दरवाढीचा परिणाम आगामी खरीप हंगामावर मोठ्या प्रमाणात जाणवण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांनी शासनाने डिझेल दर नियंत्रणात ठेवावेत तसेच शेतीसाठी काही प्रमाणात सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.


