चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जेना नदीपात्रातून बिनापरवाना रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिसांनी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर आणि बिनानंबरची ट्रॉली असा तब्बल ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.४७ वाजता माहिती मिळाल्यानंतर सपोनि संजय मिश्रा, पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर (ब.नं. ८१६) व धीरज गोवर्धन (ब.नं. १३०५) यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले. बेलोरा गावाजवळ पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.
रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास जेना गावाच्या पुढे स्वराज ७७४ एफई ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ टीसी ००६ लाल रंगाच्या बिनानंबरच्या ट्रॉलीसह आढळून आला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालक सुषांत मुकींदा कुळमेथे (वय २६, रा. किलोनी) याची चौकशी केली. ट्रॉलीमध्ये रेती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचांसमक्ष ट्रॉलीची पाहणी केली असता त्यामध्ये एक ब्रास रेती आढळून आली. पोलिसांनी ट्रॅक्टरची अंदाजे किंमत ७ लाख रुपये, ट्रॉली २ लाख रुपये आणि रेती ८ हजार रुपये, असा एकूण ९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सुषांत कुळमेथे याने सदर ट्रॅक्टर व ट्रॉली गजानन पिंपळकर, रा. जेना यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. जेना नाल्यातून रेती भरून अरविंदो कंपनीत खाली करण्यासाठी आपल्याला पाठविण्यात आल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी सुषांत मुकींदा कुळमेथे याच्यावर कारवाई करण्यात आली असून, गजानन पिंपळकर यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ४७(७), ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, जेना नाल्यातून बिनापरवाना रेती वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि पोलिस रात्रीच्या वेळी धडक कारवाई करून ट्रॅक्टर पकडतात. त्यामुळे रेती उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारा महसूल विभाग नेमकी काय भूमिका बजावत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
घाट परिसरात नियमित पाहणी होते का? बिनापरवाना रेती उत्खनन व वाहतूक महसूल विभागाच्या नजरेतून कशी सुटते? पोलिसांनी कारवाई करून ९ लाख ८ हजारांचा मुद्देमाल पकडला; आता महसूल विभाग पुढे काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय मिश्रा, पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर, धीरज गोवर्धन व पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टर पकडला; आता महसूल विभागाची कारवाई कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.

