रात्रीस खेळ चाले ! गिरणा नदीत अवैध वाळू उपसा

0

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क 

गिरणा नदीतील अवैध वाळू उपसावर नियंत्रण आणि कारवाई करणाऱ्याची महसूल खात्याची जबाबदारी आहे. तरी भडगाव तालुक्यातच वाळू उपशाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लेखी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा रमेश कांबळे यांनी दिला आहे.

भडगाव तालुक्यासह शहरात रात्री गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. रात्रंदिवस जेसीबीद्वारे नदी पात्रातील वाळू कोरून डंपरद्वारे वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याने नागरिकांना रात्रीची झोपही अशक्य झाली आहे. याबाबत तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन देवून सुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागी करावे लागणार असल्याचे रमेश कांबळे यांनी सांगितले.

भडगाव तालुक्यासह शहरात खुलेआम वाळू उपलब्ध होते. नदी काठांवर, शेतात, वडधे, महादेव बर्डी, पारोळा रोड मेगा सिटी येथे वाळूचे साठे करण्यात आले आहे. हे सामान्य माणसाला सहज दिसते. मात्र प्रशासनाला दिसत नाही.

अवैध वाळूच्या धंद्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना वरून वरदहस्त आहे. एक बिनभांडवली, झटपट श्रीमंत होण्याचा धंदा म्हणून याकडे पाहिले जात आहे. आपलेच सरकार आणि आपलेच सांभाळणारे त्यामुळे या वाळू माफियांची हिंमत, मुजोरी वाढली आहे. अवैध वाळू उपशाविरोधात एम.पी.डी.ए कायदा लावण्याची गोंडस भाषा केली जात असली, तरी तो कायदा लावला जाणार नाही याची या कार्यकर्त्यांना पूर्ण जाणीव आहे. वाळूचे वाहन पकडले गेले तरी सोडण्याबाबत फोन आल्यावर महसूल अधिकाऱ्यांना सोडणे भाग असते. यामुळे महसूल विभाग देखील हतबल झालेला दिसून येतो. या विभागाने खंबीर पावले उचलली, गुन्हे दाखल करीत वाहन परवान्यांचे निलंबन केल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते. मात्र तेवढे धाडस दबलेले अधिकारी करू शकणार नाहीत हे सर्वसामान्यांना कळून चुकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.