लोकशाही संपादकीय लेख
गेल्या 80-90 वर्षात झाला नाही एवढा प्रचंड पाऊस यंदा मराठवाड्यात झाला. मराठवाड्यातील धाराशिव, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाला आहे. प्रचंड पावसामुळे उभ्या पिकातील जमीन खरडून गेली आहे. पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक गुरे दगावली. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरात असलेले आणि संसारासाठी जमवलेले सर्व किडूक मिडूक पावसाच्या पाण्यात वाहून गेले. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटलेली नसल्याने सर्व कुटुंबाचे कुटुंब उपाशीपोटी जीवन जगत आहेत. अचानक सर्वाधिक पाऊस झाल्याने प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पावसाच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन शेतकरी नवरा बायकोला वाचवण्यासाठी त्या पुरात एनडीआरएफचे जवान सुद्धा उतरायला घाबरत होते. तथापि धाराशीवचे शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्याच्या विचार उडी घेतली. पुराचे कमरेपेक्षा जास्त पाणी होते. खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मध्यरात्री पाण्यात उतरताच एनडीआरएफच्या जवानांना सुद्धा स्फूर्ती आली. ते जवानही पाण्यात उतरले. खासदार राजेनिंबाळकरांसह एनडीआरएफच्या जवानांनी त्या शेतकरी नवरा बायकोला पाण्याबाहेर सुखरूप काढून त्यांचे प्राण वाचवले. लोकप्रतिनिधी असावा तर खासदार ओम राजेनिंबाळकरांसारखा म्हणून धाराशिव जिल्ह्यातील जनतेने खासदार ओमराजेंवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. खासदार ओम राजेनिंबाळकर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक तीन लाख मते मिळवून निवडून का आले? त्याचे रहस्य आज उलगडले आहे. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी जर खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे सारखे असतील तर महाराष्ट्राचा आणि देशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. परंतु आजचे लोकप्रतिनिधींकडून स्वतःच्या स्वार्थापलीकडे कसलीही भूमिका दिसून येत नाही. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्ष पूरस्थितीच्या जनतेला वाचवण्यासाठी मदतीला धावून जायला हवे होते. परंतु सर्व काही उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अन्नधान्य आणि संसाराला लागणाऱ्या वस्तू भरून 70 – 80 टेम्पो भरून ते स्वतः आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले. सर्व मदत दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर शिंदे आणि सरनाईक यांचे फोटो छापलेले होते. सर्व काही उध्वस्त झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी ही शोबाजी पाहून सर्व 70 – 80 टेम्पो मधील मदत स्वीकारण्याऐवजी तीपरत पाठवली. दुःखात असणाऱ्या शेतकऱ्याने आपला स्वाभिमानी बाणा शिंदे आणि सरनाईक यांना दाखवून दिला..
धाराशिव जिल्ह्यासारखीच अतिवृष्टी बीड जिल्ह्यात देखील झाली आहे. तिथे सुद्धा परिस्थिती भयावह होती. तेथे सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी जे कार्य केले तेही आदर्शवत असे होते. परंतु आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे वक्तव्य केले, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व सहानुभूती तर सोडाच उलट “आम्ही काय गोत्या खेळायला आलोय काय?” असे म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करून आपली शेतकऱ्यांप्रति असलेली अवकात दाखवून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुराच्या पाण्यात जीव द्यायला तयार झालेले खासदार ओम राजेनिंबाळकर कुठे? आणि हे मग्रूर लोकप्रतिनिधी कुठे? हे सत्य समोर आले. खासदार राजेनिंबाळकर आणि अजित पवार यांची तुलना केली तर लोकप्रतिनिधी कसा असावा हे स्पष्ट होते. सत्तेच्या राजकारणाचा फायदा घेऊन लोकप्रतिनिधींनी स्वतःची तुंबडी भरत आहेत. लाखो नव्हे तर करोडो रुपयांची कमाई करत आहेत. आणि शेतकऱ्यांना मदतीची वेळ आली तर जणू काही त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहेत, असा आव आणतात. आपत्ती मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना भेटायला गेले, तर तेथे मदतीसाठी “आम्ही काही खिशात पैसे घेऊनच फिरतोय काय?” असा उर्मट प्रतिप्रश्न करून शेतकऱ्यांचा दुःखात भर घातली. ही बाब सर्वसामान्यांना खटकणारी नाही का? त्यामुळे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या विचारात परिपक्वता हवी. ती दिसत नाही. त्यामुळे प्रगत महाराष्ट्र राज्य कोणत्या दिशेला जात आहे, हे यावरून स्पष्ट होते. पंजाब मधील अतिवृष्टी मधील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी 50 हजार रुपयाची तातडीची मदत दिली गेली आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातून फक्त सात हजाराची तूटपुंजी मदत जाहीर केली जाते हे कशाचे लक्षण आहे? म्हणून आता यापुढे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार सुरेश धस यांच्यासारखे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राला आणि देशाला मिळावेत हीच काय ती अपेक्षा..!