लोकशाही न्यूज नेटवर्क
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर चढवलेल्या हल्ल्याचे जगभरात पडसाद उमटत आहेत. आता अमेरिकेने भारतासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकर खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकेकडून ३० दिवसांची सूट देण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे, अशी परवानगी अमेरिकेकडून देण्यात आली आहे. मात्र ही सूट अवघ्य 30 दिवसांसाठी आहे. “भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी अमेरिका भारताला रशियन तेल खरेदी करण्यास 30दिवसांची सूट देत आहे” असं अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं होतं.
मात्र आता याच मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बारत सरकारवर तसेच पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. अमेरिका भारताला नाचवत्ये, नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या हातातील कठपुतळी आहेत, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्त्र सोडलं.
तर थूत तुमच्या जिंदगानीवर..
रशियाकडून तेल घ्यायला आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे, असं अमेरिका भारताला सांगत आहे. हे आम्ही (भारत ) ठरवत नाहीये. भारताला अमेरिका नाचवत्ये. नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपतुळी आहेत. अमेरिकेच्या फॉरेन सेक्रेटरींनी जे ट्विट केलं आहे, भारताला आम्ही परवानगी दिली आहे, असं त्यांनी म्हटलंय. परवानगी ही गुलामांना देतात. हो आम्ही तु्म्हाला आज परवानगी दिलेली आहे, तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. सध्याच्या युद्धपरिस्थितीमध्ये आम्हाला गरज आहे, म्हणून रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहेरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू, तर थूत तुमच्या जिंदगानीवर.. अशा खोचक शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधानांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणीही राऊत यांनी केली.
परिस्थिती फार गंभीर…
या युद्ध परिस्थितीत ज्याप्रमाणे भारताचं नेतृत्व चूप आहे, याचा अर्थ या युद्धखोर लांडग्याविरुद्ध उभं राहण्याची त्यांच्यामध्ये हिंमतच नाहीये, अशी टीकाही राऊतांनी केली. या युद्धखोर परिस्थितीमुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, निर्यातीवर फार बंधनं आली आहेत. शेती उत्पादन, फळ फळावळ, कापड, टेक्स्टाईल यावर बंधनं आली आहेत. यावर सरकारकडे याक्षणी कोणतीही भूमिका नाही. काही विद्यार्थी, पर्यचक, काम धंद्यासाठी गेलेले नागरिक, अशी आमची हजारो लोकं ठिकठिकाणी अडकून पडले आहेत, यावर काय करणार याबद्दलही सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. परिस्थिती फार गंभीर आहे, असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.

