अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर उतरली माणुसकी!

चौकाचौकात रस्ता सुरक्षेची साद : अखिल विश्व धर्म ज्ञान संस्थेचा पुढाकार

0

जळगाव : वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे वाढणारे अपघात हे शहरासाठी गंभीर संकट ठरत असताना, या समस्येवर थेट प्रहार करत अखिल विश्व धर्म ज्ञान संस्थेतर्फे शनिवारी जळगाव शहरातील प्रमुख चौकांमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. ‘नियम पाळा, जीव वाचवा’ या ठळक संदेशासह रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी वाहनचालकांना क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडले.
जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या अभियानात संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात जनजागृतीचे फलक घेऊन चौकाचौकात उभे राहिले होते. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा झुगारणे अशा सवयी थेट अपघातांना आमंत्रण देत असल्याचे फलकांद्वारे मांडण्यात आले. नेहमी गडबडीत असलेले वाहनचालकही या वेळी फलक वाचताना दिसले, हीच या उपक्रमाची प्रभावीता सांगणारी बाब ठरली.
अखिल विश्व धर्म ज्ञान संस्थेची स्थापना 1988 मध्ये अल्लमा सय्यद अब्दुल्लाह तारीक यांनी केली. समाजसेवा हा केवळ उपक्रम नसून ती जबाबदारी आहे, या भूमिकेतून संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. गरजवंतांना अन्न व पाण्याची व्यवस्था करणे हा संस्थेचा मूळ उद्देश असला, तरी काळाची गरज ओळखून संस्था सामाजिक प्रश्नांवरही सक्रियपणे पुढाकार घेत आहे. करुणा आणि दयेचा संदेश केवळ शब्दांत न राहता कृतीतून पोहोचावा, या भावनेतूनच रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. रस्त्यावर घडणारा अपघात हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो, ही जाणीव वाहनचालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
संस्थेतर्फे गरजूंना अन्न वाटप, वृक्षारोपण, गोरगरीब रुग्णांना मदत, तसेच दर सोमवारी जिल्हा रुग्णालयात नाश्ता वाटप असे उपक्रम सातत्याने राबविले जातात. प्रेषित मोहम्मद यांनी दिलेल्या मानवता, सेवाभाव आणि समाजकल्याणाच्या संदेशानुसार संस्था कार्यरत आहे. या अभियानामुळे शहरात रस्ता सुरक्षेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, जळगावकरांनी संस्थेच्या या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. केवळ दंडात्मक कारवाईवर अवलंबून न राहता, अशा जनजागृतीच्या माध्यमातूनच अपघातांना आळा घालता येईल, अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वाहतूक पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलिस हेड कॉन्स्टेबल मेघना जोशी यांच्यासह उपस्थित सर्व वाहतूक पोलिसांचे सहकार्य लाभले. रॅली यशस्वीतेसाठी संस्थेचे मुबीना शेख, इशरत जहा, सरवत जहा, आमेना शेख, निकहत शेख, आफरीन खाटीक, इमरान खाटीक, रंजना सपकाळे, कामरान शेख, रय्यान अली, आणि सालीक शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.