लोकशाही संपादकीय लेख
प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी लोक संघर्ष मोर्चाद्वारे हजारो आदिवासी बांधव आपल्या जमिनी मिळाव्यात, या हक्कासाठी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या धरून बसले आहेत. या ठिय्यासोबतच काल या मोर्चाच्या वतीने तीन तास महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे आकाशवाणी चौकातील वाहतूक तीन तास कोंडून पडली होती. आदिवासी बांधव या बाबतीत फार पक्के आहेत. एकदा आदेश मिळाला की मग कसली तमा बाळगायची नाही, तो आदेश पाळण्यात येतो. प्रतिभा शिंदे यांचे जबरदस्त नेतृत्व आहे. त्यांच्या शब्दाबाहेर एकही आदिवासी जात नाही. रस्त्यावर ठिय्या मांडून तेथेच ते आपले जेवण करतात. प्रतिभा शिंदे या सरकारमधील एक भाग असताना इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात मोर्चा काढतात. महायुतीतील राष्ट्रवादी एक घटक पक्ष असताना त्या मोर्चाचे नेतृत्व करून त्याला पुढे नेतात. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे त्यांना पाठिंबा दिला आहे. आदिवासींच्या मागण्या योग्य असून त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालीच पाहिजे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे म्हणणे आहे. आज किंवा उद्या आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके हे मोर्चास्थळी येऊन त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत विचारविनिमय करणार आहेत. त्यामुळे आता मोर्चात जास्त तापणार आहे, असे दिसते.

