लोकशाही संपादकीय लेख

ऑपरेशन टायगर..! उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला किंवा शिवसेना शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. त्या खासदारांमध्ये वाशिमचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, मुंबईचे संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र दिल्याचे कळते. ओमराजे निंबाळकर हे नाईलाजास्तव त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल कोर्टात प्रलंबित आहे. तो निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्यासंदर्भात त्यांना गळ घातली आहे, असे समजते. या सहा खासदारांपैकी एकाला राज्यमंत्री करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे देखील सांगण्यात येते. त्यामुळे एकदाचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे देखील कळते. उद्धव ठाकरेंना मात्र हा फार मोठा धक्का म्हणावा लागेल. यामध्ये पैशाचाही मोठा घोडेबाजार झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक खासदाराला 50 कोटी रुपये देण्याचे कबूल करण्यात आले आहे. आणि त्यापैकी आता पंधरा कोटी रुपये दिले आहेत. आणि उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येते किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. एकंदरीत पैशाच्या जोरावर जर खासदार फुटत असतील तर या इतकी वाईट गोष्ट कोणतीच नाही. कुणाला मंत्रिपद हवे आहे! कुणाला पैसे हवे आहेत! एकंदरीत पैशाचा जोर काय काम करतो हे दिसून येते आहे. अलीकडे राजकारणात काही तत्वे राहिलेली नाहीत. पक्ष बदलण्याच्या गोष्टी होत असतात. त्यातलाच हा प्रकार नव्हे काय? धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर हे म्हणायचे “माझी छाती फाडली तर त्यात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तुम्हाला दिसतील, इतका मी त्यांच्याशी एकनिष्ठ पाईक आहे”. पण त्या ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून दिली. दुसऱ्या शिवसेनेत प्रवेश केला. आता या मंडळींना मतदार संघात काय स्थान मिळेल हे सांगता येत नाही. धाराशिवमध्ये मतदार फार चिडले आहेत. ‘ते जर मतदार संघात आले तर त्यांच्या गाडीसह त्यांना आम्ही जाळून टाकू’, एवढ्या तीव्र शब्दात मतदार बोलत आहेत. मतदारांचा राग सहाजिक आहे. त्यांच्या मनाला येईल तेव्हा तुम्ही पक्ष बदल करता. पक्ष बदलायचा असेल तर तुम्ही आधीच पक्षाचा राजीनामा द्या, मगच पक्ष सोडा. त्यानंतर तुम्ही कुठल्याही पक्षात जाऊ शकता. निंबाळकरांना आता चांगले वाटत असेल, पण पुढच्या निवडणुकीत त्यांना मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे. काही झाले तरी चालेल पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडणार नाही, असे म्हणणारे निंबाळकर कोणत्या थराला गेले आहेत? हे कळत नाही. आता कायदेशीर लढायला सुरुवात झाली आहे. उद्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी सर्व खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून व्हीप काढण्यात आले आहे. हे व्हीप किती जण स्वीकारतात हे पाहावे लागेल. परंतु हा व्हीप वगैरे गोष्टी तकलादू आहेत. कायद्याच्या अनेक पळवाटा आहेत. त्यामुळे हे फुटलेले खासदार सही सलामत सुटू शकतात. आजच उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे खासदार अपात्रतेपासून सुटू शकतात. त्यांच्याकडे वकिलांची मोठी फौज असते आणि त्याच बरोबरीत सत्ताधारी भाजप त्यांना साथ देत आहे. त्यामुळे त्यांचे काहीही होणार नाही. त्यांना फक्त भीती आहे ती निवडणुकीत निवडून येण्याची. त्यांना मतदार हेच धडा शिकवतील आणि त्यांना घरी बसतील हे मात्र निश्चित आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतही त्याचा अनुभव आला. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे सुरुवातीपासूनच मोठा जोश दाखवत होते. “मीच निवडून येणार.. माझा पहिला पूर्ण प्रचार दौरा संपला आहे..” त्यात भाजप सह सेनेचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवाराचा मला पाठिंबा मिळत असल्याचा डंका त्यांनी वाजवला.. “मला कुणाचा दबाव नाही.. मी कुणाला घाबरणार नाही.. माझी उमेदवारी शेवटपर्यंत कायम राहील…” असे त्यांनी सांगितले आणि सुरुवातीला 109 नगरसेवकांची बैठक भुसावळला पार पडली. त्यात या 109 सदस्यांनी मला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. म्हणून मी माझी उमेदवारी कायम ठेवत आहे, असे सांगितले आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला त्यांनी मी माघार घेत असल्याच्या गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की, मला आमदार बच्चू कडू यांचा फोन आला होता. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचाही फोन आला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचाही फोन आला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा फोन आल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेऊन मी माझी उमेदवारी मागे घेतली आणि महायुतीचे उमेदवार नंदकुमार महाजन यांना माझा पाठिंबा जाहीर केला. या माघारीला आपण काय म्हणावे? यात पैशाची फार मोठी डील झाली असे सांगण्यात येते आणि झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. पैशाशिवाय कोणी असे करणार नाही. आशीर्वाद वगैरे बोलण्यासाठी ठीक आहे. पण जो खर्च केला आहे, तो खर्च काढल्याशिवाय हे थांबणार नाही काय? अनिल चौधरींची ऐनवेळी माघार म्हणजे फार मोठा घोडेबाजार झाला असला पाहिजे, असे म्हणतात आणि हे बरोबर देखील आहे. दुसरे अनिल चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एखादे पद त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. पण “विश्वासार्हतेचे काय?” हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो…!


