रामदेव बाबाच्या कानात का नाही… अमृता वहिनी गप्प कश्या बसल्या ? – संजय राऊत

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क:

ठाण्यात आयोजित एक महिलांच्या कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, ठाण्यातील त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. रामदेवबाबांनी महिलांबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही त्या गप्प कशा बसल्या? असे वक्तव्य करणारा कुणीही असो त्याच्या सणसणीत कानाखाली बसल्या पाहिजेत.

“माझ्यासारखा आपण (महिला) काहीही परिधान केले नाही तरीही चांगले दिसतात!” असे वादग्रस्त वक्तव्य रामदेवबाबा यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात केले होते. खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, रामदेवबाबांनी केलेले विधान अतिशय लज्जास्पद आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरे तर मुख्यमंत्रीच आहेत. त्यांच्या पत्नी अमृता वहिनीदेखील रामदेवबाबांच्या या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांनी हे वाक्य ऐकून कसे घेतले? एकीकडे महिला रक्षण, सबलीकरणाच्या गप्पा करता, यावर ज्ञान पाजळता. दुसरीकडे, असंख्य महिलांसमोर भगव्या वस्त्रातील एक जण महिलांचा असा अपमान करतो. असे वक्तव्य करणारा कुणीही असो त्याच्या कानाखाली बसली पाहीजे.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बुलढाण्यात जाहीर सभा आहे. त्याविषयी संजय राऊत म्हणाले, आम्ही आजही राज्यात ठाकरे सरकार आहे, असेच मानतो. बुलढाण्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारविषयी महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. ठाकरे सभेत सर्वांचा समाचार घेतील.

मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना राऊत म्हणाले, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगलीतील काही गावांवर दावा केला, तेव्हाही शिंदे शांत बसले. आता भाजपचे प्रचारक असलेले रामदेवबाबा महिलांविषयी त्यांच्याच जिल्ह्यात अभद्र बोलत आहेत. तरीही शिंदे काही बोलत नाहीत. त्यांनी जीभ दिल्लीला गहाण ठेवली आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.