
लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईत तब्बल 11 लाख 5 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या मदतीने करण्यात आली.
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात फिर्यादीच्या घरात दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली होती. फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे उघडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 12 लाख 23 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान ही टोळी मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित संशयितांना ताब्यात घेतले.
या कारवाईत निलेश उर्फ भुरा माहोरिया, ताराचंद सोलंकी, राकेश सोलंकी, गोविंद उर्फ छोटू आहेर, दिलीप मंगा माहोरिया आदी आरोपींना अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडून 39 ग्रॅम सोन्याचे दागिने, 11 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 5 लाख 78 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 11 लाख 5 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या मालाचा मोठा भाग पोलिसांनी हस्तगत केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक धमेन्द्र धक्के, प्रमोद लाडजांभळे, किरण चौधरी, गिरीश पाटील, मोतीलाल तोरसे, विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, प्रशांत मराठे, नितीन ठाकूर, राहुल येडगे यांनी कारवार्इ केली.

