विद्यार्थ्यांना दिलासा.. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना एप्रिलपासून सुट्टी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या तर काही प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने सुरु होत्या. मात्र यामुळे अभ्यासक्रम अपुरा राहिला होता. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळ्यातही शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामुळे विद्यार्थी हिरमुसले होते. परंतु आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रम अपूर्ण राहिलेल्या शाळांचेच वर्ग एप्रिल महिन्यात पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. ज्या शाळांचा अभ्यास पूर्ण झाला असेल अशा शाळांना एप्रिलपासून उन्हाळी सुट्टी घेण्यास परवानगी असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा शाळांनी वार्षिक परीक्षेनंतर उन्हाळी सुट्टी जाहीर करावी तसेच नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार असल्याचेही मांढरे यांनी स्पष्ट केले.

शाळा वार्षिक परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेत आहेत. बहुसंख्य शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू असून येत्या 8 ते 10 तारखेपर्यंत परीक्षा संपणार आहेत. शाळांनी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नसून परीक्षा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर केला असल्याचे शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.